विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतुदी
मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखडय़ात वृद्धांसाठी तसेच लहान मुलांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदींनुसार, वृद्धाश्रम व पाळणाघर एकाच जागी असणे शक्य होणार आहे. यामुळे, सरकारदरबारी उपेक्षा नशिबी आलेल्या ज्येष्ठांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित प्रारूप विकास नियोजन आराखडय़ांतर्गत वृद्धाश्रमांसाठी आरक्षण प्रस्तावित करण्यात आले असून त्यासोबतच लहान मुलांसाठी पाळणाघरेही ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २४ वृद्धाश्रम प्रारूप स्तरावर प्रस्तावित केले आहेत. यामध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान १००० चौ.मी. जागा वृद्धाश्रमासाठी साठी आरक्षित ठेवण्याचे प्रस्तावित असून या आरक्षणाचे वैशिष्टय़ म्हणजे यात नियोजित वृद्धाश्रमांसह दिवसभर विश्रामाचे केंद्र ही उभारणे शक्य होणार आहे. ज्यामुळे दिवसा घरी कोणी नसेल आणि सोबतीची गरज असेल तर अशा वेळी ज्येष्ठ नागरिक इथे येऊन राहू शकतील. तसेच वृद्धाश्रमांसाठी प्रारूप स्तरावर आरक्षण प्रस्तावित करताना त्यामध्ये लहान मुलांसाठीचे सांभाळण्याचे केंद्रही उभारण्याची तरतूद आहे. तसेच वृद्धाश्रमासाठी आरक्षित जागांवर दवाखाना, मनोरंजनात्मक बाबी आदींचा समावेश आहे.
ही आरक्षणे प्रारूप स्तरावर प्रस्तावित करताना ती रुग्णालये, उद्याने इत्यादींच्या जवळ असतील याचीदेखील काळजी घेण्यात येणार आहे. महापालिकेने अशी सुविधा केल्यास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना आसरा मिळू शकणार आहे.