व्यावसायिक वापरासाठी जादा चटई निर्देशांक देण्याच्या प्रस्तावित तरतुदीवर टीका
एकीकडे मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शहर आणि उपनगरात दोन चटई निर्देशांक देण्याची तरतूद सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपात करण्यात आली असतानाच व्यावसायिक वापरासाठी ही मर्यादा तब्बल पाचवर नेऊन ठेवल्याने आराखडय़ाला सर्व स्तरांतून विरोध होऊ लागला आहे. अशा तरतुदीमुळे विकासक वा बांधकाम व्यावसायिकांचा ओढा परवडणारी घरे उभारण्यापेक्षा पंचतारांकित हॉटेले, व्यावसायिक संकुले वा इमारती बांधण्याकडे वाढण्याची भीती आहे. पालिकेने व्यावसायिक वापरासाठी पाच चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात अशा बांधकामांसाठी विकासकांना तब्बल दहापर्यंत चटईक्षेत्र निर्देशांक वापरण्यास देण्यात येईल, असा आरोपही होत आहे.
मुंबईची सध्याची लोकसंख्या १ कोटी २४ लाख आहे. २०२१ मध्ये लोकसंख्या १ कोटी २८ लाख होण्याचा अंदाज आहे. या लोकसंख्येसाठी सुमारे ४२ लाख घरांची आवश्यकता आहे. शहरात आजमितीला २० लाख घरे आहेत. काही नागरिकांना घरे परवडू शकतील तसेच काही जण भाडय़ाच्या घरात राहतील असा विचार करून सुधारित विकास आराखडा करताना पालिका प्रशासनाने दहा लाख घरे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नव्या मापकांनुसार प्रत्येक व्यक्तीला १८ ते २० चौरस मीटर क्षेत्रफळाप्रमाणे चार ते सहा व्यक्तींसाठी ३०, ४५ आणि ६० चौरस मीटरची (अनुक्रमे अंदाजे ३००, ४५० आणि ६०० चौरस फूट) घरे उपलब्ध करून दिली जातील. या घरांसाठी साडेचार हजार हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ही जागा नाविकास क्षेत्र (२१०० हेक्टर), मिठागरे (२६० हेक्टर), मुंबई पोर्ट ट्रस्ट (१४० हेक्टर) तसेच टीडीए (५०० हेक्टर) यांमधून घेण्याची योजना आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी हे सर्व करत असतानाच, पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यावसायिक वापरासाठी तब्बल पाचपर्यंत चटईक्षेत्रफळ बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्रशासनाला घरे बांधून द्यायची असती तर शहरांपेक्षा त्यांनी उपनगरात चटईक्षेत्रफळ वाढवून दिले असते किंवा उपकरप्राप्त इमारतींना पुनर्विकासासाठी अधिक चटईक्षेत्रफळ देणे योग्य ठरले असते. घरांची संख्या वाढवून देण्याऐवजी व्यावसायिक वापरासाठी जागा वाढवणे, त्यातही सरसकट सर्व हॉटेल्ससाठी पाच चटईक्षेत्रफळाची खैरात करण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, ते समोर यायला हवे,’ असे भाजपचे मनोज कोटक यांनी सांगितले.
‘यूडीआरआय’ संस्थेचे पंकज जोशी यांनीदेखील या तरतुदीवर टीका केली आहे. ‘व्यावसायिक वापरासाठी पाचपर्यंत चटई निर्देशांक देण्याचे प्रस्तावित असले तरी फंजिबल चटईक्षेत्रफळ, वाहनतळ, पायऱ्यांसाठी मोफत जागा आदी सुविधांचा विचार करता हे क्षेत्रफळ दहापर्यंत जाईल,’ असे ते म्हणाले. आधीच्या विकास आराखडय़ात चटई निर्देशांकाची मर्यादा आठ इतकी होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

‘बॉटलनेक’वर उतारा
चिंचोळ्या (बॉटलनेक) रस्त्यांमुळे होत असलेली वाहतूककोंडी निस्तरण्यासाठी पालिकेने प्रथमच प्रयत्न केले आहेत. या रस्त्यावरील बांधकामे हटवून रस्ता रुंदीकरणास देणाऱ्यांना तब्बल चारपर्यंत चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे शहरातील रस्ते रुंद होऊन वाहतूक सुधारण्यास मदत होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.