इमारत आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या राहणीमानात प्रचंड तफावत असल्याचे करण देत पालिकेने झोपडपट्टीवासियांना प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांना प्रतिदिन प्रतिमाणशी केवळ ४५ लिटर पाण्यावरच भागवावे लागणार आहे.
मुंबईमधील इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पालिकेकडून प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्याच धर्तीवर झोपडपट्टीवासियांनाही प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा करावा, तसेच एका झोपडीमध्ये १० सदस्य आहेत असे समजून पाणीपुरवठा करावा, अशी ठरावाची सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये पालिका सभागृहात मांडली होती. सभागृहाने ही ठरावाची एकमताने मंजूर करून पालिका आयुक्तांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठविली होती.
इमारतीमध्ये एका घरात पाच जण राहात असल्याचे गृहीत धरुन त्यांना प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येत असून घरातील शौचालयातील फ्लश आणि अन्य साधनांसाठी अतिरिक्त पाण्याचा वापर होतो. त्यामुळे त्यांना प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी पुरवले जाते. मात्र ही तफावत लक्षात घेता झोपडीमध्ये प्रतिदिन प्रतिमाणशी ४५ पाणीपुरवठा केला जातो, असे आयुक्तांच्या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईमधील १ जानेवारी २००० नंतरच्या झोपडय़ांना पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परिणामी पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. ही बाब लक्षात घेता झोपडपट्टीवासियांना प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होणार नाही, असे या अभिप्रायात स्पष्ट करण्यात आले आहे.