उपकरनिर्धारक व संकलकाच्या कामचुकारपणामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात आठ गाडय़ा जकात बुजवून मुंबईत आल्याचे सिद्ध झाले असून संबंधित उपकरनिर्धारक व संकलक निवृत्त झाल्यामुळे त्याच्या निवृत्ती वेतनातून दरमहिना दोन हजार रुपये दंड रुपात वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई-पनवेल महामार्गावरील जकात नाक्यावर १ मे २०१३ रोजी पहाटे ४ वाजता जकात न भरताच आठ गाडय़ा मुंबईत आल्या. या गाडय़ा विधी समितीचे त्यावेळचे अध्यक्ष मकरंद नार्वेकर यांनी पकडून दिल्यानंतर त्या जकात  बुद्धीसंपदा कक्षाच्या ताब्यात देण्यात आल्या.
या प्रकरणी पालिकेच्या चौकशी खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत उपकरनिर्धारक व संकलक सोन्याबापू आदक दोषी आढळले. आदक यांनी त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यावर योग्य लक्ष ठेवले नाही, तसेच त्यांच्या कामावर योग्य ते पर्यवेक्षण केले नाही. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा ठपका आदक यांच्यावर ठेवण्यात आला.
दरम्यानच्या काळात आदक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आता पुढील दोन वर्षे दरमहा त्यांच्या निवृत्ती वेतनातून दोन हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला
आहे.