गेल्या वर्षी रस्त्यावरील सिग्नलला लावलेल्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यावर पालिकेने एक पाऊल पुढे टाकत या वेळी नदी परिसरात कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी, पोईसर, वाकोला व दहिसर नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास परिसरातील लोकांना सूचना देण्यासाठी तसेच पालिकेला आपत्कालीन यंत्रणा राबवण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे.
शहरात २६ जुलैच्या महापुरानंतर नद्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष गेले. नद्या आणि मोठय़ा नाल्यांमुळे आजूबाजूच्या वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांत अनेक नाल्यांचेही रुंदीकरण करण्यात आले. सध्या सर्व नाल्यांची साफसफाई हाती घेण्यात आली आहे. तासाला २५ मिलिमीटर पाऊस पडल्यास पाण्याचा निचरा होऊ शकतो, असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र यापेक्षाही अधिक वेगाने पाऊस पडल्यास नद्यांमधील पाण्याची पातळी वाढू शकते. अशा वेळी कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला पुराची माहिती तातडीने समजू शकेल. या नद्यांच्या शेजारची वस्ती हटवण्यासाठी तसेच पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी वेगाने मदत करता येईल. मुंबईत मिठी, वाकोला, पोयसर व दहिसर या चार नद्या आहेत. प्रत्येक नदीपात्राशेजारी सध्या पाच ते सहा कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

गेल्या वर्षी मुंबईच्या रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी २५० कॅमेरे बसवण्यात आले होते. वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या आपत्कालीन विभागाने या कॅमेऱ्यांचे नियमन केले. पाणी साठलेल्या रस्त्यांवरून वाहतूक वळवून वाहतूक कोंडी टाळली गेली होती. या कॅमेऱ्यांचा उपयोग लक्षात आल्यावर या वर्षी नद्यांच्या पुरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे.