रिगल सिनेमागृहासमोरील स्मारकासाठी पालिका सभागृहात ठराव मांडणार; मात्र खर्चाबाबत संभ्रम कायम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम अद्याप मार्गी लागले नसले तरी, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहासमोर बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी धावपळ चालवली आहे. राष्ट्रपुरुष अथवा महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे सरकारी खर्चात उभारू नयेत, असा सरकारी नियम असतानाही शिवसेनेने पालिकेच्या खर्चातून हा पुतळा उभारणीसाठी प्रयत्न चालवले आहेत. यासंदर्भात पालिका सभागृहात ठराव मांडण्यात येणार असला तरी, हा खर्च नेमका कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रिगल चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेटावरील सात चौरस मीटर जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची शिवसेनेची योजना आहे. त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. मात्र, सरकारी खर्चातून पुतळे बसविण्यात येऊ नयेत, असा निर्णय शासनाने पूर्वीच घेतला असून त्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा पुतळा उभारण्यासाठी एकाद्या खासगी संस्थेने पुढाकार घेतल्यास आणि खर्च उचलल्यास सर्व बाबींची पडताळणी करून पालिका परवानगी देते. मुंबईकरांनी कराच्या रूपात पालिकेच्या तिजोरीत जमा केलेला निधी पुतळ्याच्या उभारणीत खर्च होऊ नये, अशी यामागील भूमिका आहे. याची कल्पना प्रशासनाकडून शिवसेनेला देण्यात आली होती. तरीही गेली २०-२२ वर्षे पालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या शिवसेनेने पालिकेच्याच पैशात हा पुतळा उभारण्याचा हट्ट धरला आहे.

शिवसेनेच्या हट्टाप्रमाणे पालिकेतील पैशांचा वापर करून पुतळा उभारणे शक्य नसल्याने प्रशासन पेचात पडले आहे. याची कल्पना आल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना पत्र पाठवूून बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी केली आहे. या पत्रावर गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेअंती गटनेत्यांनी मंजुरी दिली. याबाबतच्या ठरावाचा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले

आहेत. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तो पालिका सभागृहाच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सेनेच्या संस्थांचे हात वर

पुतळा उभारण्यासाठी किती खर्च येणार, पुतळा कोण उभारणार याबाबत प्रस्तावात कोणतीच माहिती नाही. शिवसेना नेत्यांच्या अनेक संस्था असून संस्थांच्या माध्यमातून नेते मंडळींनी पालिकेची विविध कामे, तसेच भूखंड पदरात पाडून घेतले आहेत. त्याद्वारे ही मंडळी बक्कळ पैसेही कमवत आहेत. मात्र शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्यासाठी यापैकी एकही संस्था पुढे येत नसल्याबद्दल पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.