अनेक गरीब विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ; पालिका आणि बेस्टच्या ढिसाळ कारभाराचा फटका

सहामाही परीक्षा संपवून दिवाळीची सुटी लागली तरी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना बेस्टचे मोफत पास मिळाले नसल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवावी लागली आहे.

गेल्या काही वर्षांत पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. विद्यार्थ्यांची घटणारी संख्या पुन्हा वाढावी यासाठी पालिका विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांसह जेवण आणि गणवेशही देत आहे, तर शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट पासही देत आहे. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत आणि स्वस्तात शाळेत पोहचता यावे, यासाठी बेस्टकडून दरवर्षी मोफत पास दिले जातात. यंदाही जे विद्यार्थी शाळेपासून लांब राहतात, अशा ६ हजार ३०७ विद्यार्थ्यांचे अर्ज बेस्टकडे जमा झाले आहेत. मात्र सहामाही परीक्षा संपल्यानंतरही बेस्टने या पासचे वाटप विद्यार्थ्यांना केलेले नाही.

देवनार कॉलनी येथे राहणारे मनसेचे विभागप्रमुख अ‍ॅड. विजय रावराणे यांनी महिनाभरापूर्वी चेंबूर-वाशीनाका येथील एका पालिका शाळेत भेट देण्यासाठी गेले होते. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने त्यांनी मुलांच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली. बेस्टने मोफत पास न दिल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे शिक्षकांनी त्यांना सांगितले. रावराणे यांनी तात्काळ याबाबत बेस्ट मुख्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून याबाबत विचारणा केली.

बेस्टकडे मुंबईतून एकूण ६ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी मोफत बसपास मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. यातील ४ हजार ३९९ स्मार्टकार्ड तयार असून उर्वरित ओळखपत्र तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बेस्टने माहिती अधिकारात दिली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

विद्यार्थ्यांकडून मोफत पाससाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत त्या मुलांना हे पास उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. मात्र चार महिन्यांनंतरही पालिकेने हे पास न दिल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे. पालिका आणि बेस्टच्या या ढिसाळ कारभारामुळे सध्या अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालिकेने हे पास लवकरच विद्यार्थ्यांना द्यावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

पालिकेकडून आलेल्या अर्जानुसार आमच्याकडे सर्व पास तयार आहेत. पालिकेने सांगितल्यास या पासचे तत्काळ वितरण करण्यात येईल. मात्र पालिकेकडून आम्हाला तसे आदेश देण्यात आलेले नाहीत.

– मनोज वराडे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट