आणखी २२५ हॉटेलविरुद्ध कारवाई ७४ गॅस सिलिंडर जप्त
‘सिटी किनारा’ दुर्घटनेनंतर पालिकेने नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील हॉटेल्सविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून बुधवारी तिसऱ्या दिवशी तब्बल २२५ हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामध्ये हॉटेल फाऊंटन प्लाझा, रहेमानी रेस्टॉरंट, हॉटेल कोहिनूर पार्क, कोहिनूर बँक्वेट, ओह! कोलकाता आदींचा समावेश आह. तर अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि पालिकेचे अनुज्ञापन पत्र नसलेल्या चेंबूर-गोवंडी परिसरातील सहा हॉटेलला पालिकेने बुधवारी सील ठोकले, तर विविध ठिकाणच्या हॉटेल्समधील अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. सलग तिसऱ्या दिवशी कारवाईचा धडाका सुरूच असल्याने हॉटेलमालकांनी धसका घेतला आहे.
कुर्ला येथील ‘सिटी किनारा’मधील गॅस सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन लागलेल्या आगीत आठ जण मृत्युमुखी पडले. त्यात सात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईतील श्रेणी-२ व श्रेणी-३ मधील हॉटेल्सची तपासणी करण्याचे आदेश दिले. बुधवारी तब्बल २२५ हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या तीन दिवसांमध्ये सुमारे ६५० हून अधिक हॉटेल्सविरुद्ध कारवाई करण्यात आली.

सहा हॉटेल्सना सील
अग्निशमन दलाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि पालिकेकडून अनुज्ञापन पत्र न घेताच, तसेच सर्व नियम धुडकावून चेंबूर-गोवंडी परिसरात थाटण्यात आलेल्या पाच हॉटेल्स आणि एका स्वीटमार्टला पालिकेने बुधवारी सील ठोकले. त्यामध्ये कॅफे आशियाना, हॉटेल वेलकम, रेहमानी रेस्टॉरंट, अल ताज रेस्टॉरंट, न्यू तवा फास्टफूड आणि बिस्मिल्ला स्वीट मार्टचा समावेश आहे.

हॉटेल ग्रीष्माच्या अतिक्रमणावर हातोडा
कारवाईसाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्याला मंगळवारी परळ येथील हॉटेल ग्रीष्ममधील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. मात्र पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी हॉटेल ग्रीष्ममधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला.