नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी १३ जणांवर कारवाई;

एकाची हकालपट्टी, ९ अभियंत्यांची पदावनती

मुंबईमधील नालेसफाई घोटाळ्यात ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या १३ पालिका अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यापैकी प्रोबेशनवर (परिवीक्षाधीन कालावधी) असलेल्या एका दुय्यम अभियंत्याची पालिका प्रशासनाने सेवेतून हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर दोषी आढळलेल्या नऊ अभियंत्यांना पदावनती, तर एका मुकादमावर तीन वेतनवाढ कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय सेवानिवृत्त झालेला मुकादम आणि जलनिस्सारण साहाय्यकावर २५ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेतर्फे कंत्राटदारांमार्फत मुंबईमधील छोटय़ा-मोठय़ा नाल्यांची सफाई केली जाते. मात्र नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने होत नसल्याने मुंबईतील सखल भाग जलमय होऊन त्याचा नागरिकांना फटका बसत असल्याचे निदर्शनास आले होते. नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याने त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली होती. तसेच वजनकाटय़ामध्ये कशा पद्धतीने पालिकेची फसवणूक होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश देत चौकशी समिती नेमली होती.

आयुक्तांनी नेमलेल्या कुकनूर समितीने नालेसफाई घोटाळ्याचा अहवाल अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे. हा अहवाल आयुक्तांनी स्वीकारला असून त्यात १४ जणांविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आहे. अहवालात केलेल्या शिफारशीनुसार १३ जणांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या सेवेत परिवीक्षाधीन (प्रोबेशन) कालावधीत असलेले दुय्यम       अभियंता प्रशांत पटेल यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहेत. त्याचबरोबर साहाय्यक अभियंता संजीव कोळी, सुदेश गवळी यांची दुय्यम अभियंता पदावर, तर दुय्यम अभियंता भगवान राणे, प्रफुल्ल पडनेरे, नरेश पोळ यांची कनिष्ठ अभियंता पदावर पदावनती करण्यात आली आहे. पालिकेच्या सेवेत रुजू होऊन केवळ १० दिवस झालेले साहाय्यक अभियंते रमेश पटवर्धन व प्रदीप पाटील यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्य दोन दुय्यम अभियंते त्याच पदावर सेवेत रुजू झाल्याने त्यांना निम्न श्रेणीवर ठेवण्याचे, तर एका मुकादमाची तीन वेतनवाढी कायमच्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्यात दोषी आढळलेला एक मुकादम आणि एक जलनिस्सारण साहाय्यक निवृत्त झाले असून त्यांच्यावर २५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या दोघांच्या निवृत्ती देयकांतून २५ हजार रुपये कापून घेण्यात येणार आहेत.

घोटाळा काय?

* पालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्याने नाल्यातील गाळाची मुंबईबाहेर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपविण्यात आली होती.

* मुंबईबाहेरील भूखंडावर गाळ टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट करीत संबंधित जमीनमालकाचे संमतिपत्र पालिकेला सादर केले होते. मात्र ही संमतिपत्रे बनावट असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले होते.

* नाल्यातून उपसलेला गाळ वाहून नेण्यासाठी दुचाकी, तीनचाकी वाहनांचा वापर झाल्याचे, एकच वाहन एकाच वेळी दोन ठिकाणी गाळ वाहून नेत असल्याच्या नोंदी चौकशीमध्ये आढळून आल्या होत्या.

* या प्रकरणी चौकशीअंती पालिकेच्या १४ अभियंत्यांना निलंबित करून त्यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचबरोबर ३४ कंत्राटदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

* १४ जणांपैकी एक दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मुरुडकर तुरुंगात असल्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.