घाऊक प्रमाणात खरेदी कराव्या लागणाऱ्या डिझेलवर लिटरमागे दहा ते बारा रुपये अधिक मोजणाऱ्या पालिकेला दोन वर्षांनी जाग आली असून शुक्रवारपासून पालिकेच्या वाहनांमध्ये बाहेरच्या पेट्रोलपंपावर इंधन भरण्याची सुरुवात झाली आहे.
डिझेलची पेट्रोलपंपावरील प्रतिलिटर किंमत ६३ रुपये असून घाऊक प्रमाणात ते खरेदी करण्यासाठी प्रतिलिटर ७३ ते ७५ रुपये मोजावे लागतात. घाऊक इंधनाची किंमत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानंतर पहिल्यांदा राज्य परिवहन मंडळाने व त्यानंतर बेस्टने गाडय़ांमध्ये बाहेरील पेट्रोलपंपांमधून इंधन भरण्याचा निर्णय घेतला. पालिकेकडे अधिकाऱ्यांच्या गाडय़ा, घनकचरा गाडय़ा, अग्निशमन दलाच्या गाडय़ा अशी हजारो वाहने आहेत. त्यासाठी प्रचंड प्रमाणात इंधन लागत असतानाही हे इंधन बाहेरून भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. पालिकेच्या स्वत:च्या चार पंपांमधून हे इंधन भरले जात असे. मात्र इंधनाचा खर्च डोईजड होऊ लागल्याने अखेर दोन वर्षांनंतर पालिकेने हा निर्णय घेतला.