केंद्र आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय योजनेच्या धर्तीवर पालिका कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय गट विमा योजनेची कवचकुंडले लाभणार आहेत. विशेष म्हणजे ही विमा योजना कार्यान्वित होण्यापूर्वी झालेल्या आजारांसाठीही विमा संरक्षण मिळणार आहे. पालिका प्रशासनाने या योजनेअंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याचा पाच लाखांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला असून त्याचा लाभ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.
वैद्यकीय गट विमा योजनेअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांचा तीन वर्षांचा विमा काढण्याचा निर्णय प्रशासाने घेतला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा पाच लाख रुपयांचा विमा काढण्यात येणार असून पत्नी आणि १८ वर्षांखालील दोन मुलांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी पालिकेने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीशी करार केला असून पहिल्या वर्षांसाठी ८४ कोटी रुपये अधिक सेवा कर अशी रक्कम या कंपनीला देण्यात येणार आहे.
डायलिसीस, नेत्र शस्त्रक्रिया, केमोथेरपी, टॉक्सीलेक्टोमी, अपघातामुळे होणारी दातांची शस्त्रक्रिया आदींचाही या योजनेत समावेश आहे. अपघात अथवा वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात कमीत कमी २४ तास आधी दाखल करण्याची अट शिथिल झाली आहे. देशातील सुमारे चार हजार रुग्णालये, मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पनवेल याथील ३२० रुग्णालयांत रोखीशिवाय उपचार घेण्याची मुभाही कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
रुग्णालयांमध्ये दाखल करण्यापूर्वीच्या ३० दिवस आधीपर्यंत आजाराच्या तपासण्यांवरील खर्च तसेच रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्यानंतर पुढील ६० दिवसांपर्यंतच्या औषधोपचारासाठी या विम्याचे संरक्षण मिळणार आहे. हृदयविकार, कर्करोग, अर्धागवायू, आतडय़ाचे विकार, मूत्रपिंड विकार, हृदय शस्त्रक्रिया आदींसाठी कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.
या योजनेमध्ये प्रसूतीच्या खर्चासाठी नऊ महिन्यांच्या कालावधीची अट काढून टाकण्यात आली आहे. नैसर्गिक प्रसूतीसाठी ३५ हजार रुपये, तर शस्त्रक्रियेसाठी ५० हजार रुपये विमा संरक्षण मिळणार आहे. अपघातामुळे गर्भपात झाल्यास त्यासही विमा संरक्षण मिळणार आहे. प्रसूती विम्याच्या व्यतिरिक्त बाळाच्या जन्माच्या दिवसापासून त्याला विमा संरक्षण मिळणार आहे.

यासाठी मिळणार संरक्षण
* दहशतवादी, नक्षली हल्ल्यात दुखापत
* अपघात झाल्यास बाह्य़रुग्म विभागातील उपचारासाठी २५,००० रु.
* आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, नेचरोपथीचा खर्च मिळणार
* अवयव रोपणाचा खर्च मिळणार
* निवृत्तीनंतरही योजनेचा सशुल्क फायदा