पालिकेतर्फे तीन महिन्यांत पूलबांधणीच्या कामांचा धडाका

पुढील वर्षांच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्ष चाचपणी करत असताना मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पुलांचे हत्यार बाहेर काढले आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये मुंबईत तब्बल सहाशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या पुलांचे कार्यादेश काढण्यात येणार असून त्यात जुन्या पुलांच्या रुंदीकरणासोबतच नवीन पूल उभारणीचेही प्रस्ताव आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘करून दाखवले’ हे सांगण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या या धडपडीला पालिका प्रशासनाचीही साथ मिळाल्याने मुंबईत सध्या साडेआठशे कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. त्यापैकी सर्वाधिक ७२० कोटींची कामे पश्चिम उपनगरांत आहेत.

फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास लागण्याची शक्यता असली तरी, निवडणुकांची रणधुमाळी दिवाळी संपताच सुरू होईल, असा अंदाज आहे. एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाइतकी मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीची चावी पटकावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप आणि शिवसेना या सध्या एकत्रितपणे सत्तेत असलेल्या दोन पक्षांतही स्वबळावर एकहाती सत्ता मिळवण्याची खुमखुमी आहे. या पाश्र्वभूमीवर निवडणुकीला सामोरे जाताना जनतेसमोर आपल्या जास्तीत जास्त कामांचा हिशोब मांडण्याचा या पक्षांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व भूमीपूजन करून ही कामे आपल्या नावावर जमा करण्याची चढाओढ लागली आहे.

पालिकेच्या प्रत्येक विभागातील कामांचे कार्यादेश काढण्यासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. यातच मुंबईत अनेक ठिकाणी नवीन पूल, जुन्या पुलांचे रुंदीकरण, दुरुस्ती तसेच विविध रेल्वेस्थानकांजवळील भुयारी मार्गाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. यापैकी तब्बल साडेआठशे कोटी रुपयांच्या कामांना आधीच सुरुवात झाली असून पावसाळ्यानंतर या कामांचा पुढचा टप्पा सुरू होईल. याव्यतिरिक्त तब्बल सहाशे कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश पुढील तीन महिन्यांत निघणार आहेत. या कामांसाठी या आर्थिक वर्षांत दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी कामे पूर्ण होण्याऐवजी ती सुरू करण्यात राजकीय नेत्यांना अधिक स्वारस्य असल्याने स्थायी समितीत पुढील महिन्यात कामे मंजुरीचा धडाका लागण्याचा अंदाज आहे.

यातील दोन कामांचे कार्यादेश देण्याबाबतची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच मिठी नदीवरील एका पुलाला पर्यावरणाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. उर्वरित कामांपैकी काही कामांच्या निविदा पुढील दोन महिन्यांत उघडल्या जाणार असून इतर कामांना मंजुरी मिळवण्यासाठी स्थायी समितीत प्रस्ताव ठेवले जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील तीन महिन्यांत सुरू होणारी महत्त्वाची कामे

* घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपूल – ३१४ कोटी रुपये

* अंधेरी प. येथील लोखंडवाला रस्ता व यारी रोडच्या जंक् शनवरील वाहनपूल – ३४ कोटी रुपये

* मिठी नदीवरील धारावी थिएटरजवळील पुलाचे रुंदीकरण – ३१ कोटी रुपये

* विक्रोळी रेल्वे स्थानकावरील वाहतूक पूल – ३० कोटी रुपये

* मालाड पश्चिमेकडील महाकाली नाक्यावरील पुलाचे रुंदीकरण – १२ कोटी रुपये

* मालवणी नाला येथील पुलाचे रुंदीकरण – ११ कोटी रुपये

* कांदिवली येथील दत्तानी मार्गावर पोईसर नदीवरील पूल – १८ कोटी रुपये

* कांदिवली पश्चिम येथील पटेल नगरमधील पूल – १२ कोटी रुपये

* देवनार कॉलनीतील पुलाचे रुंदीकरण – १७ कोटी रुपये

* मिठी नदीवर सीएसटी रोडजवळील पुलाचे रुंदीकरण – ४४ कोटी रुपये

जोगेश्वरी स्कायवॉकला १ ऑक्टोबरपासून सुरुवात

ईस्माइल युसूफ महाविद्यालयापासून एस. व्ही. रोडपर्यंत जाणाऱ्या स्कायवॉकचे काम १ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येईल. या स्कायवॉकला सरकते जिने लावण्यात येणार असून दहा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी या आर्थिक वर्षांत तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हा स्कायवॉक दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.