बेकायदा बांधकाम, अग्निसुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव, चटईक्षेत्रविषयक नियमांचे उल्लंघन, भिंत पाडून तयार केलेले दोनपेक्षा अधिक गाळे, भिंत घालून केलेले एका गाळ्याचे दोन गाळे आदी प्रकारची अनियमितता आढळून आलेल्या मुंबईतील मॉल्सच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. याबाबत कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी पालिकेने केली त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
वांद्रे (प.) येथील केनिलवर्थ शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सर्व मॉल्स पाहणीचे आदेश दिले होते. त्यानुसार खार परिसरातील झैन आर्केड, श्रीजी प्लाझा, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाइज मॉल, लिंक कॉर्नर मॉल, लिंक स्वेअर मॉल, तसेच वांद्रे येथील न्यू ब्यूटी सेंटर आदी मॉल्सची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
काही मॉल्सनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. चार चाकी वाहनांसाठी आरक्षित असलेल्या उद्वाहनाची (कार लिफ्ट) जागा, तसेच जिन्याखालील जागेच्या चटईक्षेत्राबाबत अनियमितता आढळून आली. इमारतीच्या तळघराचा वापर सामान ठेवण्यासाठी करण्यात येत असून परवानगी नसलेल्या बाबींसाठी त्याचा वापर होत आहे.
दुकानांमध्ये फेरफार, मोकळ्या जागा- सज्जे यामध्ये अनियमितता, तळघरात व इतर ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा साठा, लघू अग्निशमन यंत्र आणि वाळूच्या बादल्या, तसेच माहितीदर्शक फलकांचा अभाव, वायुविजनासाठी आवश्यक जागेचा गैरवापर, सीलबंद नसलेली विद्युत नियमन यंत्रणा, अग्निशमन खात्याची परवानगी न घेताच बांधलेले पोटमाळे, धोक्याची सूचना देणारी यंत्रणा आदींचा अभाव या मॉल्समध्ये आढळून आला आहे.
या मॉल्सची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर नोटीस बजावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

विक्रोळीतील आरसिटी मॉलवर गुन्हा
गुरुदासपूरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला असताना विक्रोळी येथील आर सिटी मॉलमधील सुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्याने  मॉलच्या व्यवस्थापक आणि सुरक्षा एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॉलमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलीस साध्या वेशात आर सिटी मॉलमध्ये शस्त्र लपवून गेले होते. मात्र मुख्य प्रवेशद्वारातील धातुशोधक यंत्रातून त्यांनी सहज प्रवेश केला. त्यांची नीट तपासणी करण्यात आली नाही.