वृक्ष पुनरेपणाच्या नावाखाली पालिकेकडून धूळफेक

गेल्या सात वर्षांत विविध विकासकामांसाठी शहरातील सुमारे २५ हजार वृक्ष तोडण्यास महापालिकेकडून संमती देण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. मात्र यापेक्षा दुपटीहून अधिक झाडांना पुनरेपित करण्यासाठी पालिकेने परवानगी दिली असून या झाडांचे नेमके काय झाले त्याचा कोणताही लेखाजोखा पालिकेकडे उपलब्ध नाही.

सात वर्षांत किती झाडे तोडली गेली याची माहिती पालिकेने दिली, मात्र यात पुनरेपित करण्याची अट घातलेल्या झाडांची माहिती देण्यात आलेली नाही, असे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करणाऱ्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले.

वृक्ष पुनरेपणाच्या नावाखाली महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. पुनरेपण कुठे आणि कसे केले जाते याबाबत पालिकेने गेल्या पाच वर्षांत एका शब्दानेही उत्तर दिलेले नाही. जेवढी झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली जाते त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात झाडे पुनरेपित करण्यास सांगितले जाते. त्यामुळे पर्यावरणप्रेमाचा बुरखा पालिका ओढून घेत असली तरी प्रत्यक्षात ही झाडेही नष्ट होतात, हे वास्तव आहे, असे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य निरंजन शेट्टी यांनी सांगितले.

अटीचे नेमके काय होते?

विकासकामे आवश्यक असल्याचे सांगत पालिकेकडून वृक्षांना तोडण्याची परवानगी दिली जाते. २०१० ते २०१६ या काळात २५,०१८ झाडे कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.शहरात विकासकामांच्या नावाखाली सरसकट झाडे तोडली जातात. मात्र या झाडांऐवजी इतर दोन झाडे लावण्याच्या अटीचे नेमके काय होते, याची पालिकेकडे माहिती नसते.