एका दिवसात ९५ झाडे उन्मळली; रविवारपासून १९० झाडांना फटका

पावसाचा जोर जास्त नसला तरी गेल्या काही दिवसांपासून सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे मुंबईतील वृक्षसंपदेचे मोठे नुकसान होत असून बुधवारी एका दिवसात तब्बल ९५ झाडे पडल्याच्या तक्रारी मुंबई महापालिकेकडे आल्या आहेत. रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात १९० झाडांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. वाढते काँक्रीटीकरण आणि खोलवर रुजू न शकलेली मुळे यामुळे मुंबई शहरातील झाडे कमकुवत बनली असून निसर्गाच्या माऱ्यात ती उन्मळून पडत असल्याचा आरोप होत आहे.

वादळवाऱ्यात टिकण्यासाठी झाडांची मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. मात्र मुंबईत रस्त्यांवर डांबरीकरणामुळे तसेच गटार, ड्रेनेजसारख्या बांधकामामुळे मुळे पसरता येत नसल्याने अनेक झाडे पहिल्या पावसात पडतात. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ९५ झाडे किंवा त्यांच्या मोठय़ा फांद्या पडल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. यातील २६ झाडे दक्षिण मुंबईतील, २७ झाडे पूर्व उपनगरांतील तर ४२ झाडे पश्चिम उपनगरांतील आहेत. विशेष म्हणजे बुधवारी सकाळच्या नोंदीनुसार कुलाबा येथे ६७ मिमी तर सांताक्रूझ येथे ३९ मिमी पाऊस पडला होता.

पावसात झाडे पडू नयेत यासाठी मे महिन्यात त्यांची शास्त्रीयदृष्टय़ा छाटणी करण्याचे पालिकेने ठरवले होते. मात्र हा दावाही फोल ठरल्याचे दिसत आहे.

दरवर्षी पावसात शहरातील शेकडो झाडे पडतात. मात्र झाडांच्या संख्येव्यतिरिक्त कोणताही तपशील गोळा केला जात नाही. त्यामुळे यापुढे पडणाऱ्या झाडांचा तपशीलही गोळा करायला हवा, असे वृक्षअभ्यासक चंद्रकांत लट्टू यांनी सांगितले.  झाड पडण्याचे नेमके कारण काय, आजुबाजूचा परिसर कसा (पेव्हर ब्लॉक, सिमेंट, रस्ते, गटारे इ.) होता याची माहितीही ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.

चित्रपट प्रेक्षकांची सुटका

कुर्ला येथे एलबीएस रोडवरील शीतल सिनेमा येथे मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता चित्रपट सुरू असताना दादर व भिंतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर पोलिसांनी सिनेमाचा खेळ बंद करत प्रेक्षकांना सुखरूपपणे बाहेर काढले. ही इमारत रिकामी करण्यात आल्यावर पालिकेने नोटीस बजावली.