वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळ तसेच पैशांच्या अपव्ययामुळे सुखकर प्रवासाची हमी देणारा उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) या जलमार्गावरील लाँच सेवा मंगळवारी दुपारपासून अचानक बंद करण्यात आल्याने या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, काही प्रवासी लहान मचव्यातून प्रवास करू लागले असून यामुळे हा धोकादायक प्रवास थांबवून लाँच सुरू केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी एक लाँच घारापुरी परिसरात बेकायदा शिरली होती. त्यामुळे या लाँचवर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने कारवाई केली आहे. ही कारवाई मागे घेऊन लाँच पुन्हा एकदा सेवेत रुजू करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारला असल्याची माहिती मोरा येथील अधिकारी कोळी यांनी दिली आहे. उरण-मुंबईदरम्यानची ही लाँच सेवा बारमाही सुरू असल्याने या मार्गाने स्वस्त व विनावाहतूक कोंडीचा प्रवास होतो. त्याचप्रमाणे मोरा येथील शेकडो मच्छीमार व मच्छी विक्रेत्यांना मुंबई ससून डॉक व परिसरातून ये-जा करण्यासाठीही ही सेवा उपयोगी ठरते. मात्र लाँच मालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे ही सेवा बंद केल्याने उरण ते नवी मुंबईदरम्यान सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर महापालिकेच्या एन.एम.एम.टी. बससेवेवरील भार वाढला आहे.