बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचे शुक्रवारी अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो ४४ वर्षांचा होता. आज पहाटे दोन वाजता त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता यारी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

इंदरने आजवर विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ९० च्या दशकात त्याने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली होती. दबंग अभिनेता सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटातही त्याने स्क्रीन शेअर केली होती. त्यासोबतच ‘तुमको ना भूल पायेंगे’, ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून तो ‘फटी पेड हैं यार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता.

‘तिरछी टोपीवाले’, ‘कही प्यार ना हो जाये’ ‘पेइंग गेस्ट’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये दूरियां’ या चित्रपटानंतर इंदर चित्रपटसृष्टीपासून दुरावला होता.

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘मिहिर विरानी’ या भूमिकेलाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती. सलमानच्या कुटुंबासोबत इंदरचं खास नातं होतं. त्याच्या खासगी आयुष्याविषयी सांगावं तर, २०१४ मध्ये बलात्काराच्या आरोपाअंतर्गत त्याला अटकही करण्यात आली होती. पण, त्याने बलात्काराचे सर्व आरोप फेटाळले होते.