बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शबाना आझमी आणि शेखर कपूर यांनी दिल्लीतील पीडित तरूणीच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना, आजचा दिवस हा देशासाठी सर्वात लाजीरवाणा दिवस असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित तरूणीची प्रकृती अधिक खालावल्याने दोन दिवसांपूर्वी तीन सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रूग्णालयात हलवण्यात आले होते. त्याआधी तिच्यावर दिल्लीतील सफदरगंज रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. शुक्रवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ‘त्या’ तरूणीने शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी ही बातमी कळताच देशभरातून विविध माध्यमांद्वारे सर्व स्तरांतील लोकांकडून याचा निषेध करण्यात येत आहे.  
‘अमानत’ म्हणा किंवा ‘दामिनी नाव काहीही असले तरी, आता हे फक्त नाव राहिले आहे. या तरूणीचा शरीराने मृत्यू झाला असला तरी तिचा आत्मा कायम आपल्या हृदयाला हात घालत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. अमिताभ यांचा पुत्र अभिनेता अभिशेक बच्चन म्हणाला की, मी भारतीय असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. परंतू आज आपणा सर्वांना लाज वाटली पाहिजे. देशाला जागं होण्यासाठी प्रत्येकवेळी कोणातरी कोवळ्या जीवाचा प्राण जाय़लाच हवा का? ज्या देशात मी लहानाचा मोठा झालो, तो हा देश नव्हे, माझ्या मुलीने मोठं होत असताना देशाची अशाप्रकारची ओळख तिला व्हावी हे मला नको आहे.
झालं ते खूप झालं. हा दामिनीचा मृत्यू नसून आपल्या देशातील माणूसकीचा मृत्यू आहे. सरकारने जागं होऊन या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, असं गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणाल्या.
देशभरात शोकाकुल वातावरण असताना आपण शांती राखणे, गरजेचे आहे. महिलांविरुद्ध होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आपण लढत आहोत आणि आपण हिंसक होता कामा नये, असं अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या.
तीचे सर्वात मोठे दु:ख असेल की आपण सारे विसरून जाऊ. आपण सारं विसरून जाऊ अशी आशा राजकारण्यांना वाटत आहे. आपण हे सर्व विसरलो नाही, तर ती सर्वात मोठी गोष्ट असेल, असं चित्रपट निर्माता शेखर कपूर म्हणाले.
ज्या मंदिरांमध्ये स्त्री प्रतिमांची पूजा केली जाते ती सर्व मंदिरं बंद करा. भारताने रडायला हवे. तुमचे हात तुमच्या स्वत:च्या मुलीच्या रक्ताने माखले आहेत. महिलांनो तुमचं मौन तुम्हाला वाचवू शकणार नाही. बोला नाहीतर कायंमचं शांत बसा, अशी प्रतिक्रिया महेश भट यांनी दिली आहे.