उच्च न्यायालयाने खुलासा  मागवला

सप्टेंबर २००६ साली मालेगाव येथे घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटला अद्याप सुरू का झालेला नाही, असा सवाल करत खटल्याला होत असलेल्या विलंबाच्या कारणांचा अहवाल विशेष न्यायालयाकडून मागण्याचे आदेश उच्च न्यायालयाने न्यायालयीन निबंधकांना दिले आहेत.

राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्याच्या आदेशाविरोधात बॉम्बस्फोटातील आरोपी लोकेश शर्मा आणि धनसिंह यांनी अपील दाखल केले आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर त्यांनी केलेल्या अपिलावर सुनावणी झाली. त्या वेळेस ‘एनआयए’च्या वकिलांना समाधानकारक उत्तर न देता आल्याने न्यायालयाने हे आदेश दिले. शिवाय आरोपींच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेशही ‘एनआयए’ला दिले.

गेल्या तीन वर्षांपासून धनसिंह आणि शर्मा दोघेही कारागृहात आहेत. मात्र खटल्यातील आरोपींविरोधात विशेष न्यायालयाने अद्यापही आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत, असे सांगताना त्यांच्या वकिलांनी तपास कसा या यंत्रणेकडून त्या यंत्रणेकडे वर्ग झाला आणि त्याचा फटका आपल्या अशिलांना बसत असल्याचे न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी आधी अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींना विशेष न्यायालयाने गेल्या एप्रिल महिन्यात दोषमुक्त केले आहे. दोषमुक्त केलेल्या या आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा आणि ‘मोक्का’ अशा दोन कठोर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेले होते. तर शर्मा आणि धनसिंह यांच्यावर मात्र केवळ बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.