मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नोकरदार महिला जी स्वत:ची काळजी घेण्यास आणि चरितार्थ चालवण्यास समर्थ आहे ती विभक्त झालेल्या पतीकडून देखभाल खर्च मिळवण्यास पात्र ठरू शकत नाही, असा निर्वाळा एका प्रकरणात उच्चा न्यायालयाने दिला आहे. देखभाल खर्च देण्यास नकार देण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरोधात छोटय़ा पडद्यावरील एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात केलेल्या अपिलावर निर्णय देताना न्यायालयाने हे स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यां अभिनेत्रीने आपल्या अभिनेता असलेल्या पतीसोबत २०१० मध्ये फारकत घेत स्वतंत्र राहण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या घटस्फोटाचा अर्ज कुटुंब न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु स्वतंत्र राहायला लागल्यापासून तिच्या पतीने एकदाही तिला देखभाल खर्च दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर अंतिम निकाल देईपर्यंत तिला दरमहा ५० हजार रुपये देखभाल खर्च देण्याबाबतचे अंतरिम आदेश पतीला द्यावेत, अशी मागणी तिने कुटुंब न्यायालयाकडे केली होती. पतीने मात्र तिच्या या मागणीला तीव्र विरोध केला. आपण २००५ आणि २०१० मध्ये ‘बालाजी टेलिफिल्म्स्’च्या मालिकांमध्ये काम केले होते. परंतु त्यानंतर आपल्याकडे उत्पन्नाचे स्थिर साधन नाही. आता तर काम मिळेल त्यानुसार उत्पन्न मिळत असल्याचा दावा त्याने करीत पत्नीची मागणी फेटाळून लावण्याची मागणी केली होती. मात्र दोघांनीही त्यांच्या वार्षिक उत्पन्नाबाबत काहीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे देखभाल खर्चाचा मुद्दा नंतर ऐकला जाईल आणि त्यावर निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट करीत कुटुंब न्यायालयाने या अभिनेत्रीला दिलासा देण्यास नकार दिला होता. त्या विरोधात तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर तिच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस आपण कुठलीही मालिका वा चित्रपटात सध्या काम करीत नाही.

परिणामी पैशांची चणचण असते. उलट चरितार्थासाठी आपण पूर्णपणे आपल्या वयोवृद्ध पालकांवर अवलंबून असल्याचा दावा तिने देखभाल खर्चाची मागणी करताना केला होता. शिवाय पती एका तेलुगू सिनेमात काम करणार असून त्याला त्यासाठी खूप पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे आपल्या देखभाल खर्चाचे आदेश त्याला देण्याची मागणीही तिने न्यायालयाकडे केली होती. तर आम्ही दोघे एकत्र असताना तिचा, तिला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींचा एवढेच नव्हे, तर तिच्या आई-वडिलांचा खर्चही आपण उचलत होतो, असा दावा पतीच्या वतीने केला गेला.

न्यायालयानेही त्याचे म्हणणे मान्य केले. तसेच याचिकाकर्ती अभिनेत्री ही सध्या मालिका वा चित्रपटात काम करीत नाही म्हणून ती देखभाल खर्चासाठी पात्र ठरते असे नाही, असे स्पष्ट केले. उलट तिने अनेक वर्षे अभिनेत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे काम शोधण्यासाठी आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी ती समर्थ आहे, असे नमूद करीत न्यायालयाने कुटुंब न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.