अभिनेता सलमान खानच्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान खटल्याच्या अंतिम सुनावणीला ३० जुलैपासून सुरूवात होणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ३० जुलै रोजी होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जात असून यात सलमानचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.
यापूर्वी खटल्यातील पुरावे आणि कागदपत्रे अद्याप सरकारी आणि बचाव पक्षाला उपलब्ध झाले नसल्याचे सलमान खानचे वकील अमित देसाई यांनी १५ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी, असे आदेश देत न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी १ जुलैपर्यंत सुनावणी स्थगित केली होती. त्यानंतर सुरू असलेल्या सुनावण्यांच्या निष्कर्षानंतर अखेर आज झालेल्या सुनावणीत सलमान खटल्याच्या अंतिम सुनावणीसाठी ३० जुलै तारीख निश्चित करण्यात आली.
दरम्यान, सलमान खानने याकूब मेमनच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटमुळे ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणी सलमानचा जामीन रद्द करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ९९३ च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी निर्दोष असणाऱ्या याकूबला फाशी दिल्यास ती माणुसकीची हत्या ठरेल, असे ट्वीट करत सलमान खानने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठण्यास सुरूवात झाल्यानंतर सलमानने माफी मागत आपले ट्विट मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.