ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण या शहरांतील शाळा तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नशेच्या आहारी ओढणारी एक मोठी टोळी सक्रिय झाली आहे. विद्यार्थ्यांना कोकेन या अंमली पदार्थाप्रमाणे एक नशेची पावडर पुरवली जाते. ‘बुक’ या सांकेतिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या या पावडरमुळे सहा महिन्यांत व्यक्तीचे वजन निम्म्याने घटते आणि त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. या पावडरचे सेवन करणाऱ्या दोघांवर मुंब्य्रातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळवा-मुंब्रा परिसरात छापे टाकून या पावडरची विक्री करणाऱ्या पाच व्यापाऱ्यांना ़पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, या पावडरचा अंमली पदार्थामध्ये समावेश नसल्याचे सांगत पोलीसही कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण या रेल्वे स्थानकांमार्गे पहाटेच्या सुमारास या नशेच्या पावडरचा साठा शहरांमध्ये येतो. ठाणे शहरात सात ते आठ किलो, कळवा-मुंब्रा भागात चार ते पाच किलो आणि कल्याण शहरात सात ते आठ किलो पावडरचा साठा येतो.
वाढत्या मागणीमुळे एक मिलीग्रॅम पावडरची किंमत ६०० रुपयांवरून १५०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या पावडरची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक मिलीग्रॅम पावडर अवघ्या ६० रुपयांत मिळते.
या पावडरची विक्री करणारी टोळी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि कल्याण शहरातील शाळा तसेच महाविद्यालयांच्या परिसरात फिरते आणि काही विद्यार्थी हेरून त्यांना या पावडर विकली जाते.
सुरुवातीला ही पावडर मोफत देण्यात येते आणि तिची सवय लागताच मग पैसे आकारले जातात.
‘बुक’ या सांकेतिक भाषेत ओळखली जाणाऱ्या या नशेची पावडर नाकाने ओढली जाते किंवा शीतपेयातून तिचे सेवन केले जाते.
या पावडरमुळे साधारणत: १०० किलो वजनाच्या व्यक्तीचे वजन सहा महिन्यांत ६० किलोंवर येऊन ठेपते. त्यामुळे ही पावडर जीवघेणी ठरू शकते.

मोदी, फडणवीसांना पत्र
या नशेच्या पावडरचा समावेश अंमली पदार्थामध्ये नसल्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांपुढे कायद्याच्या अडचणी येत आहेत. त्यामुळे या पावडरचा अंमली पदार्थामध्ये समावेश करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार आहे.