पुस्तकांच्या पायरसीचाही बाजार जोर धरू लागला आहे. या व्यवसायामुळे लेखकांना आर्थिक तोटा सोसावा लागतो. अशाच एका रॅकेटचा ठाणे पोलिसांनी छडा लावला.

पंधरा दिवसांपूर्वीचा प्रसंग. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे काम सुरूहोते. ठाणे येथील खारकर आळीत ठाणे शहर पोलिसांची मुख्यालय इमारत आहे. या इमारतीत ठाणे पोलीस आयुक्तांपासून ते सहायक पोलीस आयुक्तपर्यंतच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. याच इमारतीत त्यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयात ते त्यादिवशी दैनंदिन कामात व्यस्त होते. त्याचवेळी त्यांचा शिपाई कार्यालयात आला आणि त्याने परविंदर कपूर नावाचे गृहस्थ भेटण्यासाठी आल्याची माहिती दिली. काहीतरी महत्त्वाची माहिती द्यायची असल्याचा निरोप परविंदरने शिपायाकडे दिला होता. तोच निरोप शिपायाने देताच रानडे यांनी त्याला तात्काळ कार्यालयात बोलावून घेतले.

मुंबईतील अंधेरी भागात परविंदर कपूर हे कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या मालकीची फायरवेल इन्वेस्टिगेशन फोर्स नावाची कंपनी असून तिचे कार्यालय कांदिवलीतील चारकोप भागात आहे. त्यांची कंपनी मनन प्रकाशन संस्थेचे कामकाज पाहण्याचे काम करते. मनन प्रकाशनमार्फत शैक्षणिक पुस्तकांची छपाई आणि विक्री करण्यात येते. त्यामुळे या पुस्तकांच्या पायरेटेड प्रती तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे अधिकार मनन प्रकाशन संस्थेने परविंदर यांच्या कंपनीला दिले आहेत. त्यामुळे परविंदर आणि त्यांचे सहकारी शहरांमध्ये फिरून मनन प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींचा शोध घेतात.  ठाण्यातील कापूरबावडी परिसरात राहणारी सुदर्शन पांडे नावाची व्यक्ती अशा पुस्तकांची मुलुंडमध्ये विक्री करत असल्याची माहिती परविंदर यांना मिळाली होती आणि हीच माहिती त्यांनी रानडे यांच्या कानावर कार्यालयातील भेटीदरम्यान घातली. शैक्षणिक पुस्तके असल्याने रानडे यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आणि ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांना सविस्तर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी सुदर्शन पांडेचा शोध सुरूकेला. तसेच त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांचे पथक नेमले. पथकाच्या तपासादरम्यान सुदर्शन हा बाळकुम येथील ढोकाळी परिसरात राहत असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे तो दररोज दोनशे ते तीनशे पुस्तके घेऊन मुलुंड येथे विक्रीसाठी जातो, अशी माहितीही पथकाला मिळाली. त्या आधारे देवीदास घेवारे यांनी कापूरबावडी परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी एक तरुण दोन्ही हातात पुस्तकांनी भरलेल्या पिशव्या घेऊन जात होता. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने संशयावरून त्याला हटकले आणि चौकशीमध्ये तोच सुर्दशन असल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने त्याला कार्यालयात आणून त्याची सविस्तर चौकशी सुरू केली.

सुदर्शनकडे सापडलेल्या पिशव्यांमध्ये वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षांची पुस्तके होती. मनन प्रकाशनतर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. मात्र, त्यांच्याकडे सापडलेल्या पुस्तकांच्या प्रती पायरेटेड होत्या. पुस्तकाची गुणवत्ता, बोधचिन्हाचा आकार, पुस्तकांची बांधणी, मूळ प्रतीमधील मजकूर यावरून या पायरेटेड प्रती असल्याचे उघड झाले. तसेच प्रत्येक पुस्तकाला आयएसबीएन (इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड बुक नंबरिंग नंबर) हा चुकीचा होता. त्यामुळे ही पायरेटेड पुस्तके असल्याची खात्री पथकाला झाली. त्यामुळे याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुदर्शनला अटक केले. त्यांच्याकडून २२७ पायरेटेड पुस्तके जप्त करण्यात आली. ही सर्व पुस्तके वाणिज्य शाखेच्या पहिला वर्षांची आहेत. या पुस्तकांच्या मजुकराच्या प्रतीची व्यवस्थित बांधणी करण्यात आली नाहीतर अशा पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन घेवारे यांनी या रॅकेटच्या सूत्रधारांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी सुदर्शनची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान, गणेश आणि दिनेश या दोघांकडून तो पुस्तके विकत घेत होता आणि या पुस्तकांची छपाई भिवंडीतील पूर्णा येथे होते, असे समोर आले. त्याआधारे पोलिसांनी पूर्णा भागातील एका गोदामात धाड टाकली. तेथील एका कोपऱ्यामध्ये पुस्तकांच्या छपाईचे काम सुरूहोते. त्या ठिकाणी इंग्रजी तसेच मराठीतील नामांकित पुस्तकांचा ढीग लागला होता आणि या सर्व पुस्तकांच्या प्रती पायरेटेड असल्याचे पहाणीतून पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा पुस्तकांची छपाई करणाऱ्या अमेंद्र खेलू झा आणि बशीर आनम मिस्त्री या दोघांना पोलिसांनी अटक केली.

रामबरण ऊर्फ दिनेश दुखासिंग याच्या सांगण्यावरून हे दोघे पुस्तकांची छपाई करीत होते. त्यामुळे नवी मुंबईतील रबाळे भागातील रामबरणच्या घरी धाड टाकून पोलिसांनी त्याला अटक केली. या धाडीदरम्यान त्याच्या घरातील पोटमाळ्यावर पोलिसांना कॉन्टीनेन्टल प्रकाशनचे ‘राऊ’ या पुस्तकाच्या १०२० पायरेटेड प्रती, तर राजहंस प्रकाशनच्या ‘अग्निपंख’ या पुस्तकाच्या १५० पायरेटेड प्रती सापडल्या. या प्रकरणात अजून दोन जण फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यापैकी एक जण बाजारात मराठी आणि इंग्रजीमध्ये कोणत्या पुस्तकांना जास्त मागणी आहे, यावर लक्ष ठेवतो आणि त्याप्रमाणे त्या पुस्तकांच्या पायरेटेड प्रती छापण्यास सांगतो. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या जवळपास सर्वच स्थानक परिसरात अशा पुस्तकांची विक्री होते. एखाद्या पुस्तकाची एक पायरेटेड प्रत छापण्यासाठी साधारण ४० रुपये खर्च येतो. त्यामुळे या व्यवसायात त्यांना चांगला नफा मिळतो. मात्र, या व्यवसायाने आता शैक्षणिक पुस्तकांच्या पायरेटेड प्रती छापण्यास सुरुवात केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले. याच मुद्दय़ावरून अटक करण्यात आलेल्या चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळणारे हे चौघे सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असून त्यांचे जामीनही न्यायालयाने फेटाळले आहेत.