बोरिवली स्थानकाच्या नूतनीकरणाचा दर्जा सुमार

‘मुंबई रेल्वे विकास कॉपरेरेशन’च्या माध्यमातून बोरिवली रेल्वे स्थानकावर केलेल्या नूतनीकरणाच्या कामाची सुमार दर्जामुळे वर्षभरातच वासलात लागली आहे. इमारतींना, भुयारी मार्गाला, पुलांना ठिकठिकाणी लागलेली गळती, उखडलेल्या फरशा, अस्वच्छता असे चित्र सध्या बोरिवली स्थानकावर दिसत असून दुरुस्ती व नूतनीकरणानंतर सौंदर्यीकरण होण्याऐवजी स्थानकाचे विद्रूपीकरण झाल्याची भावना प्रवाशी व्यक्त करत आहेत.

पश्चिम उपनगरातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेले आणि दरवर्षी रेल्वेला तिकीट विक्रीतून सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून बोरिवली स्थानकाची ओळख आहे. मात्र इथल्या फलाटावरील व भुयारी मार्गाच्या जिन्यांमधील फरशा अनेक ठिकाणी उखडल्या आहेत. पावसात इथल्या भुयारी मार्गातील छतामधून सतत पाणी गळत असते, तर जिन्यांवरही चिखल साचलेला पाहायला मिळतो. येथे नवे तिकीटगृह बांधण्यात आले आहे, परंतु या ठिकाणीही गळती सुरू असते. बोरिवलीच्या तीन क्रमांकाच्या (आधीचा एक) फलाटावर खांबाखाली बसण्याची वर्तुळाकार रचना केली आहे. मात्र ते कायम अस्वच्छ असतात.

बोरिवली स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांक तीनपासून पुढे पूर्वेच्या दिशेने फलाट क्रमांक नऊला जोडण्यासाठी नवीन रुंद पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून फलाट क्रमांक तीन, चार आणि पाचवर येण्याकरिता सरकते जिने लावण्यात आले आहेत. मात्र हे जिने अनेकदा बंद असतात. आम्हा आबालवृद्धांना सामानसुमानासह जिने चढून यावे लागते तेव्हा हे सरकते जिने नेमके कोणासाठी, असा प्रश्न पडतो अशा तक्रारीचा सूर ज्येष्ठ  महिला प्रवासी आरती वैद्य यांनी लावला.

नवीन पुलावर चार आणि पाच फलाटाला जोडणाऱ्या जिन्यावर मध्यभागी सरकता जिना लावण्यात आला आहे. त्याच्या एका बाजूला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. लोकल आल्यावर सरकत्या जिन्यावरून वर येणाऱ्या व पायऱ्या उतरून खाली जाणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी या ठिकाणी होते. अनेकदा धक्काबुक्कीही होते. सरकत्या जिन्यांचे चुकीचे नियोजन यास कारणीभूत असल्याची तक्रार प्रवाशी विनय पाठक यांनी केली.

बोरिवली स्थानकाचे नूतनीकरण करण्याकरिता कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आला आहे. परंतु कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळेच जास्त पैसे मोजूनही कामाचा दर्जा खालावलेलाच आहे.

– कलामुद्दीन मन्सुरी, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘सहयोग ब्रॉडगेज प्रवासी ट्रस्ट’

बोरिवली स्थानकाच्या नूतनीकरण व दुरुस्तीचे काम मुंबई विकास रेल कॉपरेरेशनने केले असून त्यात काही त्रुटी असल्यास त्यांना कळवण्यात येईल.

– मुकुल जैन, व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे