अवघ्या चार तासांत मेंदूवरील अतिशय अवघड अशा सहा शस्त्रक्रिया आणि तेही एका पायावर उभे राहून! आश्चर्य वाटायला लावणारी ही कामगिरी केली आहे, महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अतुल गोयल यांनी. एक पाय प्लास्टरमध्ये असतानाही एवढय़ा कमी वेळात अत्यंत जटिल अशा सहा शस्त्रक्रिया करण्याची नोंद गिनीज बुकातही नाही, हे विशेष.
डॉ. अतुल गोयल यांनी नवा विश्वविक्रमच प्रस्थापित केला असून ३० ते ८० वयोगटांतील महिलांच्या मेंदूवर त्यांनी या अवघड शस्त्रक्रिया केल्या. मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील फुगा असो किंवा स्पायनल कॉडमधील टय़ुमर असो जगभरातील न्यूरोसर्जनसाठी या शस्त्रक्रिया एक आव्हान ठरल्या आहेत. अशा वेळी पायाला फ्रॅक्चर झालेले डॉ. अतुल गोयल यांनी परदेशातून न्यूरोसर्जरीचे धडे शिकण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना या अवघड शस्त्रक्रिया करून दाखवत न्यूरोसर्जरी क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा थक्क  करणारा आलेख मांडून दाखवला. गेल्या तीन दशकांत डॉ. गोयल यांच्याकडे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील जवळपास सहाशेहून अधिक न्यूरोसर्जननी मेंदू शस्त्रक्रियेचे धडे गिरवले आहेत. मेंदूच्या शस्त्रक्रियेविषयीचे ‘जर्नल ऑफ न्यूरोसर्जरी-स्पाइन’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर अनेकदा मानाचे स्थान डॉ. अतुल गोयल यांच्या शास्त्रीय लेखांना मिळाले आहे.

न्यूरोसर्जरी विभागात सध्या ४० बेड असून शस्त्रक्रियेसाठी येणारा लोंढा लक्षात घेता किमान १०० खाटांची आवश्यकता आहे. वर्षांकाठी येथे ४६०० शस्त्रक्रिया करण्यात येत असून यातील दोन हजार शस्त्रक्रिया अत्यंत जटिल स्वरूपाच्या आहेत. खासगी रुग्णालयात यातील एकेका शस्त्रक्रियेसाठी पाच ते सात लाख रुपये आकारले जातात. त्याच शस्त्रक्रिया केईएममध्ये अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये होतात. डॉ. गोयल यांचा आम्हाला अभिमान आहे.
-डॉ. अविनाश सुपे, केईएमचे अधिष्ठाता.