‘डिस्कव्हरी’वर विशेष कार्यक्रम
गीरच्या जंगलात राज्य सिंहाचे आणि जंगलाबाहेर राज्य १,४१२ चौरस फुटांपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण अभयारण्य सांभाळणाऱ्या पुरुष अधिकाऱ्यांचे होते. तरीही २००७ साली त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या जंगलाची रक्षा करण्यासाठी, त्यातील सिंहांची मायेने देखभाल करण्यासाठी महिला वनरक्षक नेमण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली. त्या वेळी जुनागढची रहिवासी असलेल्या, खेळात रस घेणाऱ्या आणि कधीही वाघ-सिंह न पाहिलेल्या तरुण रसिला वढेरने पहिली महिला वनरक्षक म्हणून गीरच्या जंगलात पाऊल ठेवले होते. आज रसिलाबरोबर ४२ महिला वनरक्षा साहाय्यक गीरच्या जंगलात काम करत आहेत. ‘द लायन क्वीन्स ऑफ इंडिया’ म्हणून गौरवल्या गेलेल्या या गीरच्या जंगलातील महिला वनरक्षकांच्या साहसाची चित्तरकथा ‘डिस्कव्हरी वाहिनी’वर लवकरच पाहायला मिळणार आहे.
देशभरात अभयारण्यात वनरक्षक म्हणून काम करणारी गीरच्या जंगलातील ही पहिली आणि एकमेव महिला अधिकाऱ्यांची फौज आहे. वाघ-सिंहासारख्या प्राण्यांची ओळख नाही की पक्ष्यांच्या जाती-प्रजातींची साधी तोंडओळखही नाही, अशा स्थितीत अभयारण्याची जबाबदारी हातात घेतलेल्या या महिला वनरक्षक सध्या जखमी सिंहांना, अन्य वन्यप्राण्यांना वाचवण्यापासून, त्यांचे रोजचे निरीक्षण करणे, स्थानिकांना प्रशिक्षण देणे अशी फार मोठी कामगिरी पार पाडत आहेत. आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा वनरक्षा अधिकारी म्हणून इथे आले तेव्हाही मला कुठले खास प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. बरोबरच्या अधिकाऱ्यांबरोबर रोज जंगलात जाऊन जखमी प्राण्यांना हुडकायचे, जंगलातील प्राणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्यावर तिथेच ताबडतोब उपचार करायचे किंवा मग त्यांना पकडून वनविभागात आणून मग त्यांच्यावर पुढचे उपचार करायचे, त्यांची देखभाल करायची अशी कामे आम्ही अनुभवाने हळूहळू शिकत गेलो, असे रसिला वढेर यांनी सांगितले. जंगलचा राजा म्हणून सिंहाचे प्रथम दर्शन हे धडकी भरवणारेच असते, पण सिंहासारखा प्राणीही उगाचच माणसांवर हल्ला करत नाही. प्राण्यांचा आणि जंगलाचा स्वभाव ओळखून काम केले की ते जास्त सोपे होते, असे सहजपणे म्हणणाऱ्या रसिलासारख्या अधिकाऱ्यांचे काम सोपे नक्कीच नाही. २०१२ मध्ये रसिलावर सिंहाने जीवघेणा हल्ला केला होता. त्या हल्ल्यात झालेल्या गंभीर जखमांचे पंधरा व्रण रसिला अभिमानाने शरीरावर वागवलेत. आजवर ३५० सिंहांची सुटका तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी केली आहे, मात्र हे फार वेदनादायी काम आहे, सोडून दिले पाहिजे, अशी भावना एकदाही मनाला शिवली नाही असे रसिला म्हणते.
गीरच्या अभयारण्यात किती तरी पर्यटक येतात. या पर्यटकांच्या गर्दीला सांभाळून धडाडीने जंगलात शिरणाऱ्या या महिलांना आपल्याला जंगलची राणी असे कौतुकाने म्हटले जाते याचा अभिमान वाटतो. ‘डिस्कव्हरी’च्या माध्यमातून आपले काम लोकांसमोर आल्याने कुटुंबाच्या कौतुकाबरोबरच अन्य महिलांनाही या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल हे जास्त महत्त्वाचे वाटते, असे रसिला यांनी सांगितले. मात्र ‘द लायन क्वीन्स ऑफ इंडिया’ या कार्यक्रमाचे चित्रीकरण कसे झाले हे आपल्यालाही कळले नाही, असे त्यांनी सांगितले. रोज सकाळी नऊ वाजता वनविभागात आल्यानंतर कामाचा व्यापच इतका मोठा असतो की, आम्हाला चित्रीकरण वगैरे गोष्टींसाठी वेळ कसा मिळणार? जंगलातून मदतीचा ‘कॉल’ आला की आमची टीम निघायची तेव्हाच चित्रीकरण करणाऱ्या टीमला फोनवरून कळवले जायचे. आम्ही काम करत असताना तुम्हाला शक्य असेल तसे चित्रीकरण करा, तुमच्या चित्रीकरणासाठी म्हणून आम्ही वेगळे काही करणार नाही, असे त्यांना बजावून सांगितले होते. त्यामुळे आमचे वास्तव काम या कार्यक्रमात पाहायला मिळेल, असे त्या कौतुकाने सांगतात.