पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या लगीनघाईला धक्का बसला आहे. मुंबई- अहमदाबाद दरम्यानच्या देशातील पहिल्याच बुलेट ट्रेनच्या टर्मिनलसाठी जागा देण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणाने (एमएमआरडीए) स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ‘बुलेट ट्रेन’चे स्वप्न सध्या तरी ‘यार्डा’तच राहणार असे दिसत आहे.  
देशात हायस्पीड- बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा सन २००८च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित बुलेट ट्रेनचा सुसाध्यता आणि वित्तीय अहवाल तयार करण्याची जबाबदारी राईट कन्सलंटंट आणि जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) यांच्यावर सोपविण्यात आली होती. पंतप्रधानपदी विराजमान होताच नरेंद्र मोदी यांनी देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. रेल्वे अर्थसंकल्पातही त्यावर शिक्कामोर्तब झाले व विद्यमान सरकारच्या कार्यकालातच हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्धार करीत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश रेल्वेला देण्यात आले. त्यानुसार या प्रकल्पाचा अंतरिम अहवाल जुलैमध्ये रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. या अहवालात मुंबई -अहमदाबाद व्हाया ठाणे अशी ४९८.५ किमी लांबीच्या मार्गावर बुलेट ट्रेन धावण्यासाठी स्टँडर्ड गेजची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. बुलेट ट्रेनचा मार्ग बीकेसी- ठाणे- विरार- अहमदाबाद असा प्रस्तावित आहे. बीकेसी मैदानात २० मीटर भूमिगत टर्मिनस उभारण्यात येणार असून तेथूनच मेट्रो, मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडले जाणार आहे. त्यासाठी वांद्रे- कुर्ला संकुलातील जागा देण्याची मागणी रेल्वेने राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे केली होती. राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना नियोजन आणि नगरविकास विभागास दिल्या होत्या. जागेबाबत रेल्वेने केलेल्या मागणीबाबत राज्य सरकारने एमएमआरडीएकडे विचारणा केली होती. एमएमआरडीएने मात्र रेल्वेचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. बीकेसी मैदान हीच एमएमआरडीएची मोठी संपत्ती आहे. रेल्वेकडे स्वत:ची जागा पुष्कळ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जागेत बुलेट ट्रेन टर्मिनल उभारावे. त्यासाठी जागा देणे शक्य नसल्याचे पत्र प्राधिकारणाने पाठविल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
एमएमआरडीएने आपली भूमिका रेल्वे आणि केंद्र सरकारलाही कळविली आहे. मुंबईत जागेला असलेला सोन्याचा भाव आणि प्राधिकरणाची जागा न देण्याची भूमिका यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न यार्डातचा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकार कोणता निर्णय घेते यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
बुलेट ट्रेनचा प्रवास
बुलेट ट्रेन आठ ते १६ डब्यांची असेल. तिचा वेग ताशी ३०० ते ३५० किमी असेल. यासाठी २०० किमी प्रवासाठी १ हजार तर ५०० किमीच्या प्रवासासाठी १५०० रूपयांपर्यंत भाडे असेल. या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, डहाणू रोड, वाफी, वलसाड, बिलीमोरिया, भुरूच, आणंद आणि अहमदाबाद अशी प्रस्तावित स्थानके आहेत.  
बीकेसी मैदान हीच एमएमआरडीएची मोठी संपत्ती आहे. रेल्वेकडे स्वत:ची जागा पुष्कळ आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या जागेत बुलेट ट्रेन टर्मिनल उभारावे. त्यासाठी जागा देणे शक्य नाही, असे पत्र एमएमआरडीएने पाठवले आहे.
– मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेली माहिती