लाच घेताना पकडले गेलेल्या अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता सापडल्यानंतर स्वत: तो अडचणीत येतोच. परंतु कुटुंबीयही त्यात गोवले असले आणि ते चौकशीत सिद्ध झाले तर आता कुटुंबीयांनाही सहआरोपी केले जाणार आहे. लाचखोरीला आळा बसावा, या हेतूने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केलेल्या विविध मोहिमेअंतर्गत बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीत कुटुंबीयांविरुद्धही कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे.
अंधेरी येथील साहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र नेरकर यांना १५०० रुपयांच्या लाच प्रकरणात एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडे ८४ लाखांची रोकड आढळली होती. या प्रकरणी कसून चौकशी करण्यात आल्यानंतर ते व त्यांच्या पत्नी प्रतिभा यांच्या संयुक्त नावे एक कोटी १६ लाखांची मालमत्ता असल्याचे आढळून आले. त्यापैकी ९९ लाखांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या पत्नीलाही सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयात खटला सुरू होऊन त्यात दोषी आढळल्यास कुटुंबीयांनाही शिक्षा होण्याची शक्यता आहे. माजी आयपीएस अधिकारी ए. के. जैन आणि त्यांच्या पत्नी अनिता यांना विशेष न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अलीकडेच शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात दोषी आढळल्यास केवळ संबंधित अधिकारीच नव्हे तर त्याची पत्नी वा मुलांनाही शिक्षा होऊ शकते, हे या प्रकरणाने स्पष्ट झाले आहे. क्षुल्लक लाचेसाठी पकडल्या गेलेल्या सर्वच सरकारी अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी होते. ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती आढळल्यास त्याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला जातो. लाचप्रकरणी खटला सुरूच असतो आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणीही खटला दाखल केला जातो, असेही सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत अनेक अधिकारी लाच घेताना पकडले गेले असले तरी बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात यापैकी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच अधिकाऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा झाली. मात्र काही अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांची  पुढे सुटका झाली.
नवे काय?
बेहिशेबी मालमत्तेच्या काही प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही ढिलेपणा झाल्याने काही अधिकारी सुटल्याचे स्पष्ट झाले होते. काही प्रकरणे तर अनेक वर्षे पडून होती. प्रवीण दीक्षित यांनी सूत्रे स्वीकारताच ही सर्व प्रकरणे तडीस नेली. त्यापैकी अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. कुटुंबीयांचा संबंध आढळल्यास त्यांच्याविरुद्घही गुन्हे दाखल करण्याचे आदेश महासंचालकांनी दिले आहेत.

लाचखोर अधिकारी पकडला गेल्यानंतर त्याच्या घरी छापा टाकला जातो. या छाप्यात त्याच्याकडे सापडलेली बेहिशेबी रोकड तसेच अन्य मालमत्तेची चौकशी केली जाते. मात्र स्रोत लपविण्यासाठी पत्नी, मुलांच्या नावे काही मालमत्ता दाखविली जाते. चौकशीत त्यात तथ्य आढळल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्ह्य़ात मदत केल्याचा आरोप ठेवून त्यांना अटक केली जाते     
-प्रवीण दीक्षित, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.