यंदापासून प्रथम वर्ष प्रवेश नाही; इच्छुक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल केल्याचा दिंडोरा पिटणाऱ्या मुंबई विद्यापीठाने कालोपयोगी आणि मागणी असलेले विद्यापीठातील बी.एस्सी. आयटीचे पदवी शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला.

यामुळे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती नसतानाही विद्यापीठाने हा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. असे मागणी असलेले अभ्यासक्रम बंद करून नेमके विद्यापीठ काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित करू लागले आहेत. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागात पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.

काळाचा वेध घेत मुंबई विद्यापीठाने सन २०००मध्ये बी.एस्सी. आयटी हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात सुरू केला. यानंतर २००५मध्ये याच विभागात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला. पुढे विभागाच्या कक्षा रुंदावत एम.फिल आणि पीएच.डी.पर्यंतच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

विद्यापीठात या अभ्यासक्रमाला मिळालेल्या यशानंतर तो विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आला. विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया ही संपूर्णत: गुणवत्तेवर आधारित असून तेथे ठरलेल्या शुल्काव्यतिरिक्त एकही रुपया जास्त स्वीकारला जात नाही. याचबरोबर विद्यापीठात वर्ग होत असल्यामुळे ग्रंथालयापासून इतर अनेक सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येतो. याउलट महाविद्यालयात प्रवेश घेताना अनेकदा विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोटा आणि देणगीच्या मोठय़ा दिव्यातून पार पडावे लागते.

हे सर्व टाळण्यासाठी बी.एस्सी. आयटी करणारे बहुतांश विद्यार्थी विद्यापीठात होणाऱ्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षांगणिक वाढत आहे. २०११-१२ या शैक्षणिक वर्षांमध्ये या अभ्यासक्रमाला विद्यापीठात ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून हीच संख्या २०१५-१६ मध्ये ६३ वर पोहोचली आहे. मात्र जुलै महिन्यात विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे मुंबई विद्यापीठाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्ष पदवीचे प्रवेश २०१६-१७ पासून बंद करण्यात आल्याचे जाहीर केले.

हा निर्णय देताना माहिती तंत्रज्ञान शाखेच्या अ‍ॅडहॉक अभ्यासमंडळाच्या फेब्रुवारीमधील सूचनेनुसार २३ मे रोजी पार पडलेल्या विद्वत सभेत चर्चा करून घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यापीठातील आयटी विभागात दोन वर्षांनंतर केवळ पदव्युत्तर शिक्षणच उपलब्ध होणार आहे. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाची संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला.

एकीकडे शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना मुंबई विद्यापीठ मात्र एक-एक विभाग बंद करण्याच्या मार्गावर आहे. विद्यार्थ्यांनी मागणी असलेला पदवी अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे. मुंबई विद्यापीठात सुरू असेलला हा प्रकार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने धोकादायक असून या संदर्भात लवकरच आम्ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार आहोत. संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, मनविसे