प्रपंच करावा नेटका

मुंबईतील चिंचपोकळी परिसरात राहणारे साहेबराव डोके (३५ वर्षे) हे ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड’ कंपनीत कार्यालयीन साहाय्यक म्हणून काम करतात. आई, पत्नी मोनाली आणि मुलगा श्लोक असे हे चौकोनी कुटुंब. मोनाली या घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. डोके दाम्पत्याचे एकत्रित मासिक उत्पन्न ३० हजार रुपये आहे. कुटुंबाचा मासिक खर्च सुमारे २० हजार रुपये इतका आहे. सध्याच्या महागाईच्या काळातही जमा-खर्चाची सुव्यवस्थित सांगड लावून डोके कुटुंबीय मासिक वेतनाच्या ३३ टक्के म्हणजे जवळपास १० हजार रुपये शिल्लक ठेवतात. या बचतीतून सध्या ते दरमहा एका ‘एसआयपी’ योजनेत थोडी गुंतवणूक करतात. भविष्यात स्वत:चे घर घेण्याचा डोके यांचा मानस आहे. याशिवाय नजीकच्या भविष्यात एलईडी टीव्ही आणि एखादी दुचाकी खरेदी करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. डोके कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर कक्षेच्या बाहेर असल्याने त्यांना प्राप्तिकर लागू होत नाही. प्राप्तिकर मर्यादा ‘जैसे थे’ असल्याने ही परिस्थिती बदलणार नाही.

अर्थसंकल्पाचा परिणाम

सेवा कर १४.५० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक सेवेसाठी डोके यांना अधिक पैसे मोजावे लागतील. केबल, विमा यांसारख्या सेवांसाठी त्यांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

सध्या भाडय़ाच्या घरात राहणाऱ्या डोके यांना स्वत:चे घर घेण्याची इच्छा आहे. हे घर ५० लाखांपेक्षा कमी किमतीचे व ३५ लाखांपेक्षा कमी कर्ज घेऊन घेतल्यास गृहकर्जावरील व्याजावर वार्षिक ५०००० रुपयांची सूट मिळवणे त्यांना शक्य होईल.

मासिक उत्पन्न  ३० हजार रुपये

दरमहा खर्च २० हजार रुपये