नालासोपाऱ्यातील बांधकाम व्यावसायिक राजेश सिंग यांची बुधवारी सकाळी दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून हत्या केली. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजेश सिंग हे ‘त्रिलोक गॅस एजन्सी’चे मालक असून बांधकाम व्यावसायिक आहेत. नालासोपारा पूर्वेच्या साईनाथ नगर येथे त्यांचे कार्यालय आहे. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातून पूजा करून बाहेर पडले. त्यावेळी मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. सिंग यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सिंग यांच्यावर एकच गोळी डोक्यात झाडण्यात आली होती. व्यावसायिक वादातून ही हत्या झाली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.