वाशीतील एस. के. बिल्डरचा मालक सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी आपल्या कार्यालयात प्रवेश करताना सुरक्षारक्षकांच्या गणवेषात आलेल्या दोन गुन्हेगारांनी रिव्हॉल्व्हमधून चार गोळ्या झाडून व चाकूने वार करून हत्या केली. या हल्लेखोरांपैकी एक जण काल (शनिवार) जमावामुळे पोलिसांच्या तावडीत सापडला होता. तर आज (रविवार) सकाळी इमोलिअन अमोलिक या निवृत्त पोलीस अधिकऱ्याला ताब्यात घेतलं आहे. ही हत्या कुमार यांनी दाखल केलेल्या वादग्रस्त याचिकेमुळे झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना चौकशीसाठी २२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
इमॅन्यु्ल अमोलिक हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट असून पोलिस दलात त्यांची वादग्रस्त प्रतिमा आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोलिक यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांमुळे त्यांना पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते. अमोलिक हे सुनील कुमार यांना गोळ्या घालणा-या हल्लेखोराच्या सतत संपर्कात होते, असे तपासात उघड झाले आहे.
वाशी सेक्टर २८ येथे एस. के. ब्रदर्स या बिल्डरचे कार्यालय आहे. त्याचे मालक सुनील कुमार शनिवारी सकाळी आठ वाजता आपल्या कार्यालयात प्रवेश करीत असतानाच सुरक्षारक्षकाच्या वेषात असणाऱ्या दोन जणांनी प्रथम त्यांच्या गळ्यात हार घातला व नारळ फोडला. त्यामुळे कुमार काही क्षण चक्रावले. त्याचवेळी एकाने कुमार यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले, तर दुसऱ्याने त्यांना मिठी मारून छातीत चार गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने कुमार जागीच कोसळले. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तीन तासांनंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काल पोलिसांनी जमावाच्या मदतीने एकाला ताब्यात घेतले होते. व्यंकटेश शेट्टीयार (२८) असे या हल्लेखोराचे नाव असून त्याने हण्टर या सुरक्षारक्षक एजन्सीचा गणवेष घातला होता. जमावाने त्याला दगड मारून जखमी केले होते. या दगडफेकीत तो पडल्यानंतर जमावाने त्याला मारहाण सुरू केली होती. त्यावेळी तो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचे नाव घेत होता. राऊत आपले मालक असल्याचे सांगत होता. त्यामुळे या प्रकरणातील संभ्रम वाढला आहे. दरम्यान कुमार अनेक उपद्व्याप करणारे बिल्डर होते. त्यांनी पामबीच मार्गावरील वाढीव एफएसआय संदर्भात एक याचिका न्यायालयात दाखल केली आहे. त्याचप्रमाणे त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वेळा अटकही झाली होती. कुमार यांचे नवी मुंबई पालिकेतील काही अधिकाऱ्यांबरोबर साटेलोटे होते.

* नवी मुंबईतील वाशीमध्ये एस. के. बिल्डर्सचे मालक सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या घालून हत्या केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज ‘लोकसत्ता’ला उपलब्ध झाले आहे.

* सीसीटीव्ही फुटेजवरून घेण्यात आलेली एक्स्लुझिव्ह छायाचित्रे  पाहण्यासाठी येथे क्लिक करा: http://goo.gl/Btmc2