कामाठीपुऱ्यातील दुर्घटना; आठ जणांची सुटका
कामाठीपुऱ्यात दुरुस्तीचे काम सुरू असताना तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण ठार तर तीन जण जखमी झाले. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठ जणांची सुखरूप सुटका केली.
नागपाडय़ाच्या कामाठीपुऱ्यातील १४व्या गल्लीत पत्थरवाली गोलमहल ही तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक अशी तीन कुटुंबे राहतात. तर तळमजल्यावर पाच दुकाने आहेत. मोडकळीस आलेल्या या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे इमारतीतील तीनही कुटुंबे इतरत्र वास्तव्यास गेले होते. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास या इमारतीचा काही भाग कोसळला. त्यानंतर संपूर्ण इमारतच जमीनदोस्त झाली. यावेळी १२ मजूर आणि तळमजल्यावरील दुकानांत काही जण होते. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर आठ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. जखमींना जेजे आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. दरम्यान, इमारतीची मालकीबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

मृतांची नावे
वासीम मुल्ला (१४), जाबाझ मुल्ला (३०), सरफुल्ला मुल्ला (२८), अंगद चौबे (४५), कॅनोलीन मुल्ला (२६), एका महिलेची ओळख पटली नाही.