७०हून अधिक विक्रेत्यांचा बांधकाम साहित्याचा बाजार

मुंबईतील चारकोप बस डेपोसमोरील कांदळवनांवर बांधकाम साहित्य विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण करत कांदळवनांची कत्तल केल्याची बाब उघड झाली आहे. जवळपास ७० ते ८० हून अधिक विक्रेत्यांनी कांदळवनांवर अतिक्रमण केल्याने या परिसरातील एक किलोमीटर परिसरातील काही कांदळवने नष्ट झाली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही परिस्थिती अशीच असून त्यांच्यावर कारवाई न झाल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

मुंबई शहर व उपनगरात जवळपास ५ हजार ८०० हेक्टर इतके कांदळवनांचे क्षेत्र आहे. मात्र, सध्या या कांदळवनांवर ठिकठिकाणी अतिक्रमणे होत असून या तक्रारी वाढत आहेत. चारकोप बस डेपोसमोरील गोराई खाडी येथे जाणाऱ्या रस्त्याला समकक्ष अशी कांदळवने आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याच्या या जागेवर ग्रॅनाइट फरशी व अन्य बांधकाम साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. एक नव्हे तर तब्बल ७० ते ८० हून अधिक विक्रेत्यांनी ५० फुटांहून अधिक आत कांदळवनांवर अतिक्रमण केले आहे. यासाठी या विक्रेत्यांनी थेट कांदळवनांची कत्तल केली असून त्यांच्यावर विटा व दगडांचा भराव टाकला आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग झाला आहे. मात्र, स्थानिक रहिवासी व पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून ही परिस्थिती असून या विक्रेत्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कांदळवनांची कत्तल सुरूच असून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास या भागातील कांदळवने नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वन विभागा किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप याची दखल घेतली नसल्याने बांधकाम साहित्य विक्रेत्यांचे फावल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत कांदळवने संरक्षण विभागाचे प्रमुख एन. वासुदेवन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या जागेची पाहणी करून ती आमच्या हद्दीत येते की नाही याची पाहणी करण्यात येईल. जर, ती जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असेल तर अतिक्रमणे हटवण्यात येतील.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]