एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटली असली तरी भाजपने मात्र या प्रकल्पाचे समर्थनच केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. मुंबईतील उपनगरीय सेवा आधी सुधारा, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात येत आहे. बुलेट ट्रेनवरून वातावरण तापू लागले असतानाच राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोर्चा काढून जनतेच्या उद्रेकाला वाट करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

बुलेट ट्रेनवरून सत्ताधारी भाजपला राजकीय पक्ष तसेच समाज माध्यमांतून टीकेचे धनी व्हावे लागले असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र बुलेट ट्रेनचे समर्थनच केले. हा प्रकल्प होणारच असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत सर्वाना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार राज ठाकरे काय किंवा अन्य कोणीही विरोधी भूमिका मांडू शकतात. पण हा प्रकल्प पूर्ण करण्यावर भाजप सरकार कटिबद्ध आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनी बुलेट ट्रेनचे समर्थन केले असले तरी मुंबई भाजपच्या मंडळींची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. बुलेट ट्रेनवरून वातावरण तापले असताना या प्रकल्पाचे समर्थन करणे म्हणजे प्रवाशांची आणखी नाराजी ओढावून घेण्यासारखे आहे, असे मत भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केले.

बुलेट ट्रेनवरून राजकारण नको- गोयल

एल्फिन्स्टन स्थानकात झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर मुंबईत बुलेट ट्रेन नको, आधी लोकल सुधारा अशी मागणी मुंबईकरांनी तसेच व लोकप्रतिनिधींनी उचलून धरली असतानाच मात्र रेल्वेमंत्री पियुश गोयल यांनी बुलेट ट्रेनचे समर्थन केले आहे. बुलेट ट्रेनसाठी एकही विट रचू देणार नाही,असा पवित्रा घेणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही गोयल यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. काही नेत्यांच्या अशा भूमिकेमुळेच नविन तंत्रज्चान आत्मसात करता येत नाही.