यापुढे एसटी बसमध्ये एखाद्या महिलेचा विनयभंग झाला तर बसच पोलीस ठाण्यात नेऊन संबंधित व्यक्तीस पोलिसांकडे देण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार चालक-वाहकांना देण्यात आले आहेत.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने देशातील सार्वजनिक उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावले उचलण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार, एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपाय योजले आहेत. एखाद्या महिलेच्या विनयभंगाची अथवा छेडछाडीची घटना वाहक किंवा चालकाच्या लक्षात आली तर तात्काळ संपूर्ण बस नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. यामुळे संबंधित छेडछाड करणाऱ्या व्यक्तीस थेट पोलिसांच्याच हाती सोपविणे सोपे होणार आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक एसटी स्थानकावर असलेल्या पोलीस चौक्यामध्ये महिलांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या स्थानकात पोलीस चौकी नसेल तर तेथे अग्रहक्काने महिला केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या जागा महिलांनाच उपलब्ध करून देण्याबाबत वाहकांनी दक्षता बाळगावी, असेही महामंडळाने आपल्या आदेशात म्हटले आहे.