कोकणच्या मार्गावर गणपतीच्या काळात होणाऱ्या वाहतुकीच्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी खासगी बसचालकांना मुंबई-गोवा महामार्गाऐवजी प्रामुख्याने पुणे, सातारा, कोल्हापूरमार्गे जाण्याबाबतची सूचना परिवहन विभागाने काढल्याने प्रवासी-बसचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. थेट गोवा रस्त्यावरून जाण्याची परवानगी सर्वाना मिळावी, अशी विनंती बसमालकांच्या संघटनेने परिवहन विभागाला केली आहे. कोकणात पनवेलमार्गे जाणाऱ्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक होते. ते काम झालेले नाही. त्यात याच रस्त्यावर खड्डय़ांची भर पडल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वाहतुकीची कोंडी होईल म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाने अलीकडेच कोकणाकडे जाणाऱ्या खासगी बसेसना विशेष परवाना जारी करताना पुणे-कोल्हापूरमार्गे जाण्याची सूचना केली आहे.
थेट मुंबई-गोवा मार्गावरून जाण्याऐवजी पुणे-सातारा-कोल्हापूरचा लांबचा वळसा घालून कोकणाची वाट धरावी लागणार असल्याने खासगी बसमधून महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, कुडाळ आणि सावंतवाडीकडे जाणाऱ्या बसचालकांची व प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.
जवळपास ५०० खासगी बस गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जातात. चाकरमान्यांना या निर्णयाचा फटका बसणार असून व्यवसायाच्या ऐन दिवसात आमच्यावर संक्रात आणू नका, असे आवाहन मुंबई बस मालक संघटनेने परिवहन आयुक्तांना केले आहे.