गोरेगावांतील हिरवळीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या आरे वसाहतीमध्ये मेलेल्या प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक भाग मोकळा ठेवण्यात आला होता. या मोकळय़ा भागात तर सोडाच पण त्याच्या आसपासही कुणी फिरकत नसे. अशा परिस्थितीत या भागात जाऊन तेथे एक उद्यान फुलवण्याची संकल्पना गोरेगावांतील आठल्ये कुटुंबीयांच्या मनात आली आणि त्यांनी ती साकारलीही.
गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या या चळवळीत या मंडळींनी आतापर्यंत स्वखर्चाने सुमारे चार हजारांहून अधिक झाडे लावून हा परिसर हिरवागार केला. त्यांच्या या कामामुळे परिसर हिरवागार झाला एवढेच नव्हे तर जीवसृष्टीलाही त्याचा फायदा झाला. आता फुलपाखरू विषयातील अभ्यासक रेखा शहाणे यांच्या मदतीने या भागात फुलपाखरांचा मळा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. यामुळेच मुंबईतील बांधकाम व्यावसायिक बहुमजली इमारतींवर कृत्रिम बागा तयार करून ग्राहकांना भुरळ घालत असताना शहराच्या एका कोपऱ्यात नि:स्वार्थपणे ‘पंचवटी उद्यान’ फुलवण्याचे काम करणाऱ्या आठल्ये परिवाराकडे दुर्लक्ष करता येत नाही.
गोरेगावचे रहिवासी असलेले विनय आठल्ये यांनी २००१मध्ये निस्वार्थपणे आरे वसाहतीतील पडीक जमिनीवर आपल्या सवंगडय़ांच्या मदतीने पंचवटी उद्यान साकारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला एक किलोमीटरचा रस्ता निवडून त्यांनी रस्त्यांच्या दुतर्फा १०० झाडे लावली. केवळ झाडे लावून सोडली नाही तर रोज मोटारसायकलवरून पाणी घेऊन जाऊन त्या झाडांची निगा राखण्याचे काम त्यांनी व त्यांच्या मित्रांनी अखंडित सुरू ठेवले. आपण केलेल्या कामाला यश आल्याने आठल्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी २००२ साली गावदेवी रोड, म्हाडा रोड, काफ फार्म शेड, मॉडर्न रोड, आदी रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे एक हजार झाडे लावली. यात वड, िपपळ, जांभूळ, सोनचाफा, सप्तपर्णी, आंबा, बदाम, कैलासपती अशा एकूण ५० प्रकराच्या झाडांचा समावेश असल्याचे होता, अशी माहिती विनय यांचे पुत्र संदीप आठल्ये यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षे पाच एकर जागेवर बाबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चार हजारांहून अधिक झाडे लावून त्यातली ८० टक्के झाडे जगवली आहेत. पंधरा वर्षांपासून रोज वाहनाने पाणी नेऊन ही झाडे जगवण्यात आली आहेत. यात कोणताच आíथक व्यवहार नाही. निवृत्तीनंतर विनय आठल्ये (बाबा) यांनी ही सृष्टी तयार केली. आज ते नाहीत पण त्यांनी उभारलेली सृष्टी मात्र तशीच आहे. त्यामुळे तरुणांनी यातून बळ घ्यावे, सोशल नेटवìकग साइट्सवर वेळ घालवण्यापेक्षा निसर्गाचे संवर्धन करा, असे संदीप यांनी आवर्जून सांगितले. या उद्यानाला पंचवटी नाव का तर, तर पूर्वेला िपपळ, पश्चिमेला वड, दक्षिणेला आवळा, उत्तरेला बेल, आग्नेयेला अशोक अशा स्थानाला पंचवटी म्हटले जाते. म्हणून पंचवटी हे नाव देण्यात आल्याचे संदीप यांनी नमूद केले. बाबा गेल्यानंतरही आम्ही हे काम पुढे नेत आहोत. नोकरी सांभाळूनही हे काम होऊ शकते, फक्त इच्छाशक्ती असावी लागते असे संदीप म्हणतात. ज्या हिरवळीवर लोक आज बसत आहेत, तिथे कुण्या एके काळी मृत प्राण्यांची विल्हेवाट लावली जात होती, हे सांगितल्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. ही केलेल्या कामाची सर्वात मोठी पावती असल्याचे संदीप सांगतो.

६० फुलपाखरांचे वास्तव्य
नुकताच एक सर्वेक्षण केले. त्यात या ठिकाणी ६० विविध जातीची फुलपाखरे एकाच ठिकाणी आढळून आली आहेत. फुलपाखरांचे हे वास्तव्य या भागात कायम राहावे यासाठी इथे अशोका, बाभुळ, कढीपत्ता, जमकत अशी विविध प्रकारची रोपटी इथे लावण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांना चहूबाजूंनी फुलपाखरे पाहता यावीत हा त्यामागचा उद्देश आहे. आम्ही टिपलेल्या फुलपाखरांव्यतिरिक्त इथे अनेक जाती असू शकतात, असे फुलपाखरू अभ्यासक रेखा शहाणे यांनी सांगितले.