चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्यासारखा मौल्यवान धातू, नवीन वास्तू, वाहन, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा कल असतो. यंदाचा पाडवाही त्याला अपवाद नाही. सोन्याचे घसरलेले भाव आणि गृहनिर्माण क्षेत्राला पोहोचत असलेल्या मंदीच्या झळीमुळे विकासकांनी देऊ केलेल्या सवलती या दुग्धशर्करा योगामुळे सोने आणि गृह खरेदीची गुढीच यंदा जास्त उंच राहण्याची चिन्हे आहेत.
सोन्याचा भाव प्रतितोळा २६ हजार ३०० रुपयांच्या आसपास असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी आदल्या दिवसापासूनच विचारणा करण्यास सुरुवात केली होती. प्रत्यक्ष खरेदी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्याचा विचार असला तरी पाच ग्रॅमपासून ते दहा तोळ्यांपर्यंतची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी विचारणा केली असल्याची माहिती ‘मुंबई सुवर्णकार संघा’चे अध्यक्ष सुधीर पेडणेकर यांनी दिली. ठाण्यातील बडय़ा ज्वेलर्स व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ठाण्यात घडणावळीवर भरघोस सूट देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच नाणी व वळी मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गृहबांधणीमधील मंदी पथ्यावर
या वर्षी गृहबांधणी उद्योगावरही मंदीचे सावट आहे. त्यामुळे, घरांच्या खरेदीवर विकासकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती व आकर्षक ‘ऑफर्स’ देऊ केल्या आहेत. सवलतीच्या दरांपासून दर्जेदार सोयीसुविधा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या ऑफर्स आहेत. त्यामुळे, त्याचा फायदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने घराच्या शोधात असलेले ग्राहक निश्चितपणे उचलतील, अशी अपेक्षा ‘नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’चे अध्यक्ष सुनील मंत्री यांनी व्यक्त केली. दरम्यान, वाहनखरेदीला मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही वेग येऊ शकला नाही.
खरेदीचा उत्साह फूलबाजारातही आढळला. झेंडुच्या फुलांना जास्त मागणी असल्याने टनावारी फुले बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होती. ८० रुपये किलो दराने झेंडूची विक्री होत होती. त्याचबरोबर साखरेच्या पाकाचे हार व कंकण यांनाही प्रचंड मागणी होती. गुढीपाडव्याला सर्वाधिक मागणी असते ती श्रीखंडाला. विविध चवींचे श्रीखंड यानिमित्ताने बाजारात उपलब्ध आहे. श्रीखंडाबरोबरच अन्य गोड पदार्थानाही मागणी असल्याने रात्री उशिरापर्यंत मुंबई-ठाणे परिसरातील मिठाईच्या दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होती.