मौल्यवान धातू ३० हजारांखाली गेल्याने मागणीत वाढ; धनत्रयोदशीच्या दिवशी नाणी, वळे, दागिन्यांना मागणी

तोळ्यासाठी ३० हजाराखाली उतरलेल्या सोने दराने यंदाच्या धनत्रयोदशीचा मुहूर्त खरेदीदारांसाठी लाभदायी ठरला. मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये फारशी वाढ होत नसल्याचा लाभ उठवत तसेच दिवाळसण, लग्नाच्या तारखा यांची संधी साधत सराफ बाजार शुक्रवारी गजबजलेला दिसला. सोन्याची नाणी, वळे तसेच दागिन्यांच्या मागणीपोटी यंदा ३० टक्क्यांपर्यंत विक्री वाढण्याचा विश्वास सराफपेढय़ांनी व्यक्त केला आहे.

गेल्या महिन्याभरात सोन्याचा प्रति दहा ग्रॅममागे १,४०० रुपयांनी कमी झाला आहे. यंदाच्या दसऱ्यालाही सोने तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या आसपासच होते. वर्षभरापूर्वीच्या धनत्रयोदशीला सोने जवळपास २६,५०० रुपये प्रति १० गॅ्रम होते. यंदाच्या मुख्य सणांच्या मुहूर्ताला सोने तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या उंबरठय़ावर असून चांदीचा किलोचा भाव ४३ हजार रुपयांवर आहे.

यंदाच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने सरकारमार्फत जारी केली जाणारी सार्वभौम नाणी बँकांबरोबर किरकोळ विक्री दालने, ई-कॉमर्स मंचावरही उपलब्ध झाली. सलग तीन वर्षांतील सोने दरातील घसरणीनंतर वार्षिक तुलनेत यंदाच्या धनत्रयोदशीला मूल्य प्रथमच वाढले आहे. तरी ते तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या घरातच आहे. गुरुवारसत्र तुलनेत चांदीचा भाव शुक्रवारी किरकोळ वाढला असला तरी गेल्या धनत्रयोदशीच्या तुलनेत मात्र त्यातील फरक मोठा आहे. २०१५ मधील मुहूर्तखरेदीदरम्यान चांदीचा किलोचा भाव ३५,५०० रुपये होता.

सोने दरातील उतार हा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. त्यामुळे धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत ग्राहकांनी यंदा सोन्याची वेढणी, नाणी यांची खरेदी केली. तसेच दिवाळीनंतर येणाऱ्या लग्न मुहूर्तासाठीदेखील पारंपरिक दागिन्यांचीही खरेदी केली आहे. धनत्रयोदशी ही पारंपरिक सोने खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. यामुळे सर्वच स्तरांतील ग्राहकांकडून शुक्रवारी सोने खरेदी दिसून आली. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत सोने विक्री अंदाजे ५ टक्क्यांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. अमित मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी व वायदातज्ज्ञ, पु. ना. गाडगीळ आणि सन्स