मुंबईतील भायखळा येथील महिला जेलची वॉर्डन मंजुळा शेट्येच्या हत्येशी आपला काहीच संबंध नाही असे उत्तर कारागृह विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी कोर्टात दिले आहे. तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप नाकारले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्वाती साठे, जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने आणि भायखळा तुरुंगाचे सुप्रीटेडंट चंद्रमणी इंदुलकर या सगळ्यांची हजेरी होती.

डॉक्टर लहाने आणि इंदुलकर यांना त्यांचे उत्तर देण्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. भायखळा जेलमधील कैदी मरियम शेखने मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल करून गंभीर आरोप केले आहेत.

स्वाती साठे यांनी या सगळ्या आरोपांना तीन पानी उत्तर दिले आहे. भायखळा महिला तुरुंगातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तसेच आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असे साठे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांना ओळखत नाही, त्यांच्याशी फोनवरून किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नाही असेही साठे यांनी म्हटले आहे. तपास कार्यात सहकार्य करणार असल्याचेही सांगितले आहे.

मरियम शेखने केलेल्या आरोपांनुसार स्वाती साठे यांनी मंजुळाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या संपर्कात राहून दोषींना वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे स्वाती साठे यांनी सांगितले. मंजुळा शेट्येच्या हत्ये प्रकरणी एकूण ६ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.