भायखळा जेलमधील मंजुळा गोविंद शेट्ये या महिला कैद्याच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारामागे शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीचा हात होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी इंद्राणीसह अन्य महिला कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हेगारी कट रचणे, दंगल घडवणे या कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

भायखळा जेलमध्ये शनिवारी मंजुळा शेट्ये उर्फ मंजूताईचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी ऐकून महिला कैद्यांचा उद्रेक झाला होता. जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करत महिला कैद्यांनी तुरुंगात कल्लोळ केला होता. कैद्यांच्या हल्ल्यात एकूण सहा जण जखमी झाले होते. जखमींमध्ये तीन महिला पोलिसांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. तपासात इंद्राणी मुखर्जीचा सहभाग उघडकीस आला आहे.

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा जेलमध्ये आहे. इंद्राणीने महिला कैद्यांना त्यांच्या लहान मुलांना मानवी ढाल म्हणून वापर करण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तुरुंगात महिला कैद्यांसोबत त्यांच्या सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना राहण्याची मुभा असते. पोलिसांनी याप्रकरणात इंद्राणीसह २०० महिला कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मंजुळाचा कारागृहातील महिला अधिकाऱ्यासोबत काही कारणावरून शुक्रवारी सकाळी वाद झाला होता. त्यात व्हटकर यांनी मंजुळाला मारहाण केली. त्याच संध्याकाळी मंजुळा भोवळ येऊन पडली होती. मंजुळाला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले. ह्रदयविकाराच्या धक्क्याने मंजुळाचे निधन झाल्याचा दावा तुरुंग प्रशासनाने केला होता. मात्र शवविच्छेदनात मंजुळा यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने तुरुंग प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित झाले आहे.

मंजुळा भांडुपच्या नवजीवन शाळेत शिक्षिका होती. मात्र मोठ्या वहिनीच्या हत्येप्रकरणी तिला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. गेल्या तेरा वर्षांमध्ये येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना मंजुळाने अन्य निरक्षर महिला कैद्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. चांगल्या वर्तणुकीमुळे मंजुळाला वॉर्डन करण्यात आले होते. तिच्यावर सुमारे ६० महिला कैद्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दीड महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात वॉर्डन होती.