पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्यातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला एकमेव आरोपी हिमायत बेग याला येरवडा व्यतिरिक्त अन्य कारागृहात हलवणे शक्य आहे का, असा सवाल करत त्याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहे. येरवडा कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत आपल्याला पुन्हा आर्थर रोडमध्ये हलविण्याची मागणी बेगने न्यायालयाकडे केली आहे.
फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आणि बेगने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर त्याला येरवडय़ामधून आर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले होते. मात्र, त्याच्या अपिलावर सुनावणी प्रलंबित असल्याने नंतर त्याला पुन्हा येरवडा कारागृहात हलविण्यात आले. परंतु,आपल्या जिवाला येथे धोका असल्याचा दावा करत आपल्याला पुन्हा एकदा आर्थर रोड कारागृहात हलविण्याची मागणी बेगने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे.
यापूर्वी खटल्यातील सहआरोपी कातील सिद्दीकी याच्यावर येरवडामध्ये हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याही जिवाला तेथे धोका असल्याचे बेगने अर्जात म्हटले आहे.
न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर त्याच्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस बेगला येरवडाव्यतिरिक्त अन्यत्र हलविण्यात येऊ शकते का, असा सवाल करत त्याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.