एका गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी अचानक भेट दिली. आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य, घाणीचे आगार. आतील बाहेरील िभती कळकटलेल्या, मळकटेल्या. खाटा गंजलेल्या, त्यावरील बिछाना मळलेला, फाटलेला. डोके फुटते की काय असा उग्र औषधांचा उग्र दर्प. तडे गेलेल्या भिंती, कोपऱ्या-कोपऱ्यात लटकलेल्या जाळ्या. सुस्तावलेले कर्मचारी. डॉक्टर, परिचारिका पगारी कर्तव्य पार पाडत होते. त्यांनी डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना एका बाजूला बोलावले. सर्वाना फक्त एकच प्रश्न विचारला. तुमची आई, वडील, बहीण, भाऊ, कुणी आजारी पडले तर त्यांना इथे दाखल करून त्यांच्यावर उपचार कराल का? सारेच गंभीर आणि निरुत्तर. उत्तर त्यांनीच दिले. चला तुमच्या नातेवाईकांनाही तुम्हाला इथे उपचारासाठी दाखल करावे वाटेल, असे काम करूया. आणि एका वर्षांत ४८६ आरोग्य केंद्रांचा कायापालट झाला.
राज्यकर्ते असो अथवा प्रशासनाचा गाडा हाकणारे अधिकारी असोत, इच्छाशक्ती असेल तर काय घडू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी १२ जुलै २०१३ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. राधानगरी तालुक्यातील तारळे गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. त्या केंद्राची अवस्था बघून त्यांना धक्का बसला.
सामान्य माणसाला मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गावा-गावात आरोग्य केंद्रे सुरू केली, त्यावर सरकार कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे, परंतु बाजूने सुद्धा कुणी फिरकू नये, अशी वाईट अवस्था असलेल्या आरोग्य केंद्रात येणार कोण आणि आलेच तर त्याला काय दर्जाची सेवा मिळणार, असा त्यांना प्रश्न पडला. तुमच्या नातेवाईकांना तुम्ही या ठिकाणी दाखल करून उपचार कराल का, हा प्रश्न त्यांनी डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना विचारला. त्यावर डॉक्टरांसह साऱ्यांनीच कबूल केले की, आमचे काही तरी चुकते आहे. त्यांनी आवाहन केले, हे सारे बदलू या. मग कुणाची वाटच पाहिली नाही. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढली. आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. आतून-बाहेरून रंगरंगोटी केली. बघता-बघता आरोग्य केंद्राचे रूपच पालटून गेले. जिल्ह्य़ातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांनी तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली. बघता बघता काही महिन्यांत ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आणि ४१३ उपकेंद्रांचे रूपडे पालटले. त्यातूनच कायापालट या योजनेचा जन्म झाला. राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी एका अशाच एका आरोग्य केंद्राला भेट दिली आणि त्याही प्रभावित झाल्या. त्यांनी संपूर्ण राज्यात ही योजना राबिवण्याचे ठरविले. त्यानुसार आता राज्यातील सुमारे १२ हजार  आरोग्य केंद्रे स्वच्छ, सुसज्ज आणि लोकाभिमुख करण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे.  
पालघर जिल्ह्य़ातही कायापालट
नव्याने अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्हा परिषदेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. लगेच त्यांनी डहाणू जिल्ह्य़ातील आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करून पालघर जिल्ह्य़ामध्येही ही योजना राबविण्यास सुरुवात केली.