आजार केवळ शारीरिक आघात करत नाही. शरीरासोबतच रुग्ण व त्याचे कुटुंबीय मानसिक, आर्थिक, सामाजिक कोंडीत अडकून हतबल होतात. आजार जेवढा गंभीर आणि दीर्घकालीन, तेवढेच त्याचे परिणाम अधिक गडद. कर्करोगाबाबत तर हे परिणाम अधिकच गुंतागुंतीचे होतात. हे लक्षात घेऊनच, सुरुवातीला कर्करुग्णांना केवळ आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने (सीपीएए) गेल्या ४३ वर्षांत, आपला दृष्टिकोन व्यापक करत रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचे सर्वागीण पुनर्वसन करण्यावर भर दिला. एवढेच नव्हे तर नोवार्टिससारख्या बलाढय़ औषधकंपनीशी लढा देऊन कर्करोगावरील महागडे गिल्वेक औषध स्वस्त करण्यास भाग पाडले. हे सर्व घडले ते कार्यकर्त्यांच्या बळातून आणि सामाजिक पाठिंब्यातून.
कर्करोगाशी लढत असलेल्या एका लहानगीला आर्थिक मदत करण्यातून वाय. के. सप्रू यांनी १९७० मध्ये संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला आर्थिक मदत गोळा करून ती रुग्णांना पोहोचवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र केवळ आर्थिक मदत पुरेशी नसल्याचे लवकरच जाणवले. मुळात हा आजार पटकन कळत नाही, त्यामुळे या आजाराच्या जागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात आली. मग निदानासाठी मोफत तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. आजारावरील उपचारांसोबतच अन्न, औषधे, राहण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका पुरवण्याचे कामही संस्थेने सुरू केले.
कृत्रिम अवयव, लहान मुलांसाठी प्ले ग्रुप, स्नेहसंमेलन असे अनेक उपक्रम सुरू झाले. रुग्णांशी, त्याच्या नातेवाईकांशी संवाद साधताना त्यांच्या गरजा समजत गेल्या आणि त्याप्रमाणे संस्थेने कार्यक्षेत्रही वाढवत नेले. रुग्णांनी मदत मागावी आणि त्यातून संस्थेची नवी योजना सुरू व्हावी.. असा प्रवास सुरू झाला. त्यातूनच कर्करोगाविरोधातील सर्वागीण व्यवस्था उपलब्ध करण्याचे संस्थेचे ध्येय पुढे आले. रोगाचे निदान करण्यापासून रुग्णांना आर्थिक बाबतीत स्वावलंबी करण्यापर्यंतचे सर्व व्यवस्थापन संस्थेने केले.  
हा कर्करोगाविरोधातील लढा गेल्या वर्षी बहुराष्ट्रीय औषधकंपनीविरोधात न्यायदेवतेपर्यंत पोहोचला. औषधांच्या प्रचंड खर्चाखाली दबणाऱ्या सर्वच रुग्णांसाठी या न्यायालयीन लढाईने एक दरवाजा उघडून दिला. पेटंट संपल्यामुळे औषधाची किंमत तब्बल ९४ टक्क्य़ांनी कमी झाली.