सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी प्रकाश झीनक निशाद उर्फ केवट (२४) याला  गुरूवारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे सत्र न्यायाधीश सुधीर काळे यांनी फाशी व जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
भाईंदर येथील गणेश देवलनगरमध्ये सैनुमाबानो शेख (६) राहत होती. ११ जून २०१० रोजी रात्री घराबाहेरील अंगणात खेळत असतानाच ती बेपत्ता झाली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह नाल्यात सापडला होता. लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे  वैद्यकीय अहवालातून समोर आले होते. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी तपास करून प्रकाश निशाद उर्फ केवट (२४) याला अटक केली. त्यानंतर मुलीला ठार केल्याप्रकरणी ठाणे सत्र व जिल्हा न्यायालयाने प्रकाशला शिक्षा सुनावली.
 लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा  सुनावण्यात आली असून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षे कारावास आणि एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.