अनेक इंग्रजी नियतकालिकांतून हजारो व्यंगचित्रे काढणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार विजय नारायण सेठ ऊर्फ ‘विन्स’ यांचे गुरुवारी नवी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ फाइन आर्टस्मधून शिक्षण घेतानाच व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याच प्रभावामुळे त्यांनी सुरुवातीला व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. कालौघात त्यांनी एक्स्प्रेस ग्रुपच्या अनेक नियतकालिकांसाठी सायन्स, कॉम्प्युटर्स, बिझनेस, हॉटेल व्यवसाय, तसेच सामाजिक विषयांवर हजारो व्यंगचित्रे काढली. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून, तसेच प्रदर्शनातून त्यांच्या व्यंगचित्रांना स्थान मिळाले. इस्तंबूल आणि स्वीत्र्सलडमधल्या कार्टुन म्युझियममध्ये या व्यंगचित्रांना कायमस्वरूपी स्थान मिळाले.