शहर विद्रूप करणाऱ्या फलकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अखेर नागपाडा पोलिसांनी एका बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्यांने पाठपुरावा केल्यामुळे अखेर महाराष्ट्र मालमत्ता प्रतिबंधक आणि विद्रूपीकरण १९९५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेची परवानगी न घेता फौजदारी घुसखोरी केल्याचे कलमही लावण्यात आले आहे. त्यामुळे संबंधिताला अटक होऊन न्यायालयातून जामीन घ्यावा लागणार आहे. संबंधित बिल्डरने मुंबई सेंट्रल आणि नवजीवन सोसायटी जंक्शनवर १५ ऑगस्ट रोजी अनधिकृतपणे फलक लावला होता. याबाबत पालिकेने कारवाई करणे अपेक्षित होते; परंतु पालिकेकडून काहीही कारवाई न झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात पाठपुरावा केला. तसेच पालिकेच्या कायद्यानुसार नव्हे, तर भारतीय दंड संहितेच्या ४४७, ४४८ कलमान्वये फौजदारी घुसखोरी केल्याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो, असे त्यांनी पटवून सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.