मुंबईतील केईएम रूग्णलायचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर पाठक यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रूग्णालय प्रशासनाने एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कपाळावर क्रमांक टाकल्याचा राग आल्याने शिवसेना कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी डॉक्टरांना याचा जाब विचारला तसेच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. निलेश रमेश धुमाळ या शिवसेना कार्यकर्त्याने पेन घेऊन डॉक्टर पाठक यांच्या कपाळावर क्रमांक लिहिण्याचा प्रयत्न केला.

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक टाकण्यात आले याचा आम्हाला राग आल्याचे धुमाळ या कार्यकर्त्याने म्हटले आहे. तसेच रूग्णालय प्रशासनाने चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा अपमान केल्याचा आरोपही धुमाळ यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून आपण आलो आहोत असा दावा धुमाळ यांनी केला. युवराज धाकले हा शिवसेना कार्यकर्ताही आक्रमक झाला होता.

चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी होती, केईएम रूग्णालयात या घटनेत मृत्यू झालेल्या २२ नागरिकांचे मृतदेह आणले गेले. प्रत्येक मृतदेहाजवळ मृतांच्या नातेवाईकांना न्यायचे आणि मृतदेहाची ओळख पटवायची हे आमच्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी वेदनादायी होते, म्हणून आम्ही मृतदेहांच्या कपाळांवर क्रमांक लिहिले आणि त्या सगळ्या मृतदेहांचा एक एकत्र फोटो काढून मृतांच्या नातेवाईकांना दाखवू लागलो असे डॉक्टर पाठक यांनी म्हटले आहे.

मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक टाकलेल्या फोटोचे रूग्णालयातर्फे फ्लेक्सही तयार करून लावण्यात आले. ओळख पटवण्यासाठी रूग्णालयाने असे केल्याचे रूग्णालयाने म्हटले आहे. मात्र याच गोष्टीचा राग मनात ठेवून शिवसेना कार्यकर्त्यांनी डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर या शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

मृतदेहांची ओळख लवकरात लवकर पटावी आणि रूग्णालयातील औपचारिकता पूर्ण झाल्यावर हे मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांना देण्यात यावेत यासाठी आम्ही मृतदेहांच्या कपाळावर क्रमांक घातले होते. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू आमचा नव्हता असेही स्पष्टीकरण डॉक्टर पाठक यांनी दिले.