भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राम कदम यांचे बंधू दिलीप कदम यांच्याविरोधात विक्रोळीतील पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने दिलीप कदम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांचे बंधू दिलीप कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हारुन खान यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हारुन खान यांनी विक्रोळी पोलिसांकडे तक्रारही दाखल केल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही तक्रार झाल्याने राम कदम आणि त्यांच्या भावाच्या अडचणी वाढल्या आहेत. याप्रकरणी दिलीप कदम यांच्यावर कधी कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप राम कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय तसेच राज्य मंत्र्याचा समावेश असलेली २९ जणांची निवडणूक समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राम कदम यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने राम कदम यांच्या अडचणीत भर पडली आहे.